न्यूझीलंडमधल्या ‘लांबलेल्या’ लग्नाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:12 AM2024-01-17T10:12:44+5:302024-01-17T10:15:57+5:30

आयुष्यात इतके चढ-उतार आले तरी एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवणाऱ्या या जोडप्याने भविष्यात देखील एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Former Kiwi Prime Minister Jacinda Ardern finally ties the knot | न्यूझीलंडमधल्या ‘लांबलेल्या’ लग्नाची कहाणी

न्यूझीलंडमधल्या ‘लांबलेल्या’ लग्नाची कहाणी

जेसिंडा आर्डर्न या न्यूझीलंडच्या पंतप्रधान म्हणून आपल्याला सामान्यतः माहिती असतात. त्यांच्याबद्दल अनेक चांगल्या गोष्टींची चर्चा आपल्या कानावर पडलेली असते. त्यांनी त्यांच्या पक्षाला विक्रमी मतांनी निवडून आणलं. त्या वयाच्या ३७व्या वर्षी पंतप्रधान झाल्या. त्यामुळे त्या जगातील सगळ्यात लहान वयाच्या राष्ट्रप्रमुख झाल्या. राष्ट्रप्रमुख झाल्याच्या नंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर सहा आठवड्यांची बाळंतपणाची रजा घेऊन त्या लगोलग कामावर परतल्या. त्या काळात त्यांच्या बाळाला सोबत घेऊन कामकाज करतानाचे अनेक फोटोही व्हायरल झाले. न्यूझीलंडच्या संसदेपासून ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या कचेरीपर्यंत सगळीकडे त्या निवीला, म्हणजे त्यांच्या मुलीला घेऊन फिरल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आधी ठरवलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला. 

‘तुम्ही हे सर्वोच्च पद का सोडता आहात’, असं त्यांना विचारलं गेलं, तेव्हा जेसिंडा म्हणाल्या, ‘आता माझ्याकडे देण्यासारखं फार काही उरलेलं आहे असं मला वाटत नाही. ‘ जेसिंडा आर्डर्न यांच्या काळात न्यूझीलंड या देशाने अनेक संकटे झेलली. त्याचवेळी कोरोनाची साथ आली,  त्यांच्या कार्यकाळात न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्वालामुखीचा स्फोट झाला. या सगळ्या प्रसंगांमधून जेसिंडा आर्डर्न यांनी अतिशय कौशल्याने त्यांच्या देशाला सुखरूप बाहेर काढले. या सगळ्या कसोटीच्या कालखंडात त्यांचा साथीदार क्लार्क गेफोर्ड हे कायम त्यांच्याबरोबर होते. त्या दोघांचं बाळ लहान असताना क्लार्क गेफोर्ड यांनी त्यांच्या बाळाची सर्वतोपरी काळजी घेतली. जेसिंडा आर्डर्न यांना प्रवास करायला लागला तर ते कायम सोबत असत. २०१२ सालापासून एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या जोडप्याने २०१९ साली साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं. पण, त्यानंतर कोरोना आला आणि लग्न लांबणीवर पडलं. त्या दोघांनी २०२२ सालच्या सुरुवातीला पुन्हा एकदा लग्नाची घोषणा केली, मात्र त्यावेळी ओमायक्रॉनचा प्रसार होत असल्यामुळे न्यूझीलंडमध्ये १०० हून अधिक लोकांनी एकत्र येण्यावर पुन्हा एकदा निर्बंध लादावे लागले होते.  

जेसिंडा आर्डर्न आणि क्लार्क गेफोर्ड यांनी आपला लग्नसमारंभ पुन्हा एकदा पुढे ढकलला. त्यावेळी जेसिंडा आर्डर्न म्हणाल्या, “मी काही न्यूझीलंडच्या इतर नागरिकांपेक्षा वेगळी नाही. इतर लोकांना तर या साथीचा फार जास्त फटका बसला आहे. त्यातही आपल्या जवळची व्यक्ती गंभीरपणे आजारी असताना तिला भेटायलाही जाता येत नाही यासारख्या भयंकर परिस्थितीला इतर लोकांना तोंड द्यायला लागतं आहे. आमचा लग्नसमारंभ रद्द होण्याचं दुःख त्यापुढे काहीच नाही.” मात्र, या सगळ्या चढ-उतारांमध्ये जेसिंडा आर्डर्न आणि क्लार्क गेफोर्ड यांच्यातील नातं बहरत राहिलं. क्लार्क गेफोर्ड हे १९९९ सालापासून टीव्ही पत्रकारितेत आहेत. आता ते न्यूझीलंडमधील आघाडीचे टीव्ही अँकर बनले आहेत. ते ‘फिशिंग ऑफ द डे’ नावाचा कार्यक्रम सादर करतात.
२०१२ साली एका कॉमन मित्रामुळे त्या दोघांची ओळख झाली. मग, एका कायद्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी क्लार्क गेफोर्ड जेसिंडा यांना भेटले आणि मग या ना त्या कारणाने त्यांच्या भेटी होतच राहिल्या. ते दोघं सुरुवातीच्या काळात मासेमारी करायलादेखील सोबत गेले होते. कायम एकमेकांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या या जोडप्याने आयुष्यातील मोठे निर्णयदेखील एकमेकांच्या सल्ल्याने घेतले आहेत.

एखाद्या देशाचे पंतप्रधान होणे हे एखाद्याला आयुष्यातील सर्वोच्च यश वाटू शकतं, पण जेसिंडा आर्डर्न आणि क्लार्क गेफोर्ड यांना तसं वाटत नाही. त्या दोघांनी ठरवून असा निर्णय घेतला होता की जेसिंडा यांनी जानेवारी २०२३ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा. त्याप्रमाणे त्यांनी तो दिला देखील. आणि अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्याच आठवड्यात दोघांनी अखेर लग्नगाठ बांधली. न्यूझीलंडचा नॉर्थ आयलंड हा विभाग तिथले समुद्रकिनारे आणि वायनरीजसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या पूर्व किनाऱ्यावरच्या हॉक्स बे नावाच्या वायनरीमध्ये दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. इतकी वर्षं आयुष्यात इतके चढ-उतार आले तरी एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवणाऱ्या या जोडप्याने भविष्यात देखील एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

..आता हार्वर्डमध्ये शिकायला जाणार!
यापुढे जेसिंडा काय करणार?-  त्या म्हणतात, भविष्यात काय करायचं आहे याचा  विचार केलेला आहे. त्यात एक आहे ते म्हणजे ‘प्रिन्स विल्यम्स इअरशॉट प्राईझ’साठी विश्वस्त म्हणून काम करणं आणि दुसरं म्हणजे हार्वर्ड विद्यापीठात फेलोशिप मिळवणं. आजवरचा त्यांचा इतिहास बघितला, तर त्या हे दोन्ही साध्य करतील हे नक्की !

Web Title: Former Kiwi Prime Minister Jacinda Ardern finally ties the knot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.