माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन हे तर देशद्रोही; पॉम्पिओ यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:02 AM2020-06-20T04:02:20+5:302020-06-20T04:02:42+5:30
बोल्टन यांचाही पलटवार; ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र नाहीत
वॉशिंग्टन : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन व माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्यातील वाक्युद्धामध्ये विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी उडी घेतली असून, बोल्टन हे देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. बोल्टन यांनी त्यांच्यावरील विश्वासाला तडा दिला असून, अमेरिकेच्या हिताला धक्का पोहोचवला आहे, असेही म्हटले आहे.
एकीकडे बोल्टन यांच्यावर विविध नेते हल्लाबोल करीत असताना त्यांनीही एकामागून एक टष्ट्वीट करीत ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कसे पात्र नाहीत, हे दाखविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
बोल्टन यांनी एक पुस्तक लिहिले असून, त्यात अनेक गोपनीय बाबींचा पर्दाफाश केला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी चीनचे त्यांचे समपदस्थ शी जिनपिंग यांच्याकडे मदत मागितली होती, असेही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. त्याला उत्तर देताना पॉम्पिओ यांनी म्हटले आहे की, पुस्तकातील काही अंश वाचल्यानंतर माझी खात्री झाली आहे की, बोल्टन हे अनेक प्रकारची खोटी माहिती प्रसारित करीत आहेत. बोल्टन यांची भूमिका देशद्रोह्यासारखी वाटते, ही दु:खद व धोकादायक बाब आहे.
‘द रूम व्हेअर इट हॅपण्ड : अ व्हाईट हाऊस मेमोअर’ या नावाचे पुस्तक बोल्टन यांनी लिहिले असून, त्याची विक्री २३ जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी बोल्टन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून मागील वर्षी हटवले होते. त्यांच्याकडून मोठ्या चुका झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. बोल्टन यांच्या दाव्यानुसार, २९ जून २०१९ रोजी जपानच्या ओसाकामधील जी-२० शिखर संमेलनात ट्रम्प यांनी जिनपिंग यांनी भेट घेतली होती. त्यावेळी इतर चर्चा करताना ट्रम्प यांनी आपल्या दुसºया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिनपिंग यांची मदत मागितली होती, असा दावा केला होता. त्याचबरोबर चीनविरुद्धची ट्रम्प यांची कठोर भूमिका किती काळापर्यंत टिकेल, याबाबतही बोल्टन यांनी पुस्तकात साशंकता व्यक्त केली होती. त्यावर ट्रम्प यांनी यापूर्वीच आपले मत व्यक्त केले असून, बोल्टन हे खोटारडे आहेत. ते माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हा उपद्व्याप करीत आहेत, असेही म्हटले होते.
पुस्तक प्रकाशन थांबविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू
संपूर्ण जगभरात खळबळ उडवून देणारे जॉन बोल्टन यांचे पुस्तक प्रकाशित होऊन लोकांच्या हातात पडू नये यासाठी ट्रम्प प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. वॉशिंग्टन जिल्हा न्यायालयात याबाबत खटला दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे पुस्तकाच्या हजारो प्रती विक्रेत्यांपर्यंत पोहोचलेल्या असताना ही कारवाई सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.