पाकिस्तानचा माजी लष्करी अधिकारी नेपाळमधून गायब; भारतावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:28 AM2019-09-19T11:28:52+5:302019-09-19T11:30:28+5:30
भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव व्यवसायानिमित्त अफगाणिस्तानात गेले असता पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेत कथितरित्या हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. तसेच जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती.
इस्लामाबाद : काश्मीर मुद्द्यावरून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानने नेपाळमधून कथितरित्या बेपत्ता झालेल्या माजी लष्करी अधिकाऱ्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानने अडीच वर्षांपूर्वी झालेले हे बेपत्ता प्रकरण बुधवारी पुन्हा उकरून काढले.
भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव व्यवसायानिमित्त अफगाणिस्तानात गेले असता पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेत कथितरित्या हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. तसेच जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्य़ायप्रविष्ठ आहे. याच काळात पाकिस्तानचा एक माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल हबीब जहीर हा एप्रिल 2017 मध्ये नेपाळमधून बेपत्ता झाले होते. यामागे शत्रूराष्ट्राच्या एजन्सीचा हात असल्याचा आरोप आता पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय मीडिया आणि ट्विट्सनुसार हबीब भारताच्या कोठडीमध्ये असू शकतो. कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात त्याला सोडले जाऊ शकते, असे वाटते.
हबीब पाकिस्तानी लष्कराचे एक निवृत्त अधिकारी आहेत. एका नोकरीच्या मुलाखतीसाठी नेपाळमध्ये गेले असता ते तेथून गायब झाले आहेत. यामागे शत्रू राष्ट्रांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. तसेच हबीब घरी परतेपर्यंत पाकिस्तान सरकार शांत बसणार नसल्याचेही तो म्हणाला.
अडीज वर्षांनंतर पाकिस्तान अचानक भारतावर आरोप लावत आहे. यामुळे हाही एक त्यांच्या कुरघोड्यांचा भाग असल्याचा संशय बळावला आहे. कारण जाधव यांच्या बदल्यात हबीब यांच्या सुटकेच्या भारतीय मिडीयाचे अहवालांकडे बोट दाखविले जात आहे. जेव्हा जाधव यांना 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आरोप केला होता की हबीब यांना नोकरीच्या आमिषाने जाळ्यात अडकविण्यात आले. त्यांना भारतीय सीमेरेषेजवळील लुंबिनीयेथून गायब करण्यात आल्याचे म्हटले होते.