PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:53 IST2025-03-17T21:53:04+5:302025-03-17T21:53:57+5:30
नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले.

PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली
इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टरच्या मुलाखतीत नवाज शरीफ आणि पाकिस्तान दौऱ्याबाबत केलेल्या विधानावरून पाकिस्तानची फडफड सुरू झाली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ आणि भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्हिडिओ जारी करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत जे सांगितले ते पूर्ण सत्य नाही. पाकिस्तानशी संबंध सुधारावेत असं भारताला बिल्कुल वाटत नाही. जर भारत काश्मीर मुद्दा सोडवते, तर पाकिस्तानसोबत कुठलाही वादाचा मुद्दा राहणार नाही असंही बासित यांनी म्हटलं आहे.
अब्दुल बासित यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्टमध्ये पाकिस्तानसोबतच्या नात्यावर जे काही बोलले ते एकतर्फी आहे. मोदी यांनी त्यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले होते, परंतु त्यांना एकट्याला बोलावले नव्हते. सार्क देशांचे जितके राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रण दिले होते. जर ते नवाज शरीफांना एकट्याला बोलावलं असते तर मानलं असते. परंतु या गोष्टीचं कौतुक करायला हवं की जेव्हा नवाज शरीफांना आमंत्रण आले तेव्हा इस्लामाबादच्या एका लॉबीने, लोकांनी त्यांना विरोध केला तरीही शरीफ भारतात गेले असं त्यांनी म्हटलं.
फुटीरतावादी नेत्यांना न भेटण्याची अट
तसेच जेव्हा नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतात येणार होते, तेव्हा मी भारतात उच्चायुक्त होतो. माझ्या माहितीत नाही परंतु त्यावेळी नवाज शरीफ यांनी भारतात कुठल्याही फुटीरतावादी नेत्यांना भेटू नये असं भारताने मागणी केली होती. यापूर्वी पाकिस्तानी पंतप्रधान भारतात आल्यानंतर फुटिरतावादी नेत्यांना भेटण्याची परंपरा होती. परंतु नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले.
भाजपाच्या 'जाहीरनामा'वर डागली तोफ
दरम्यान, बासित यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याबाबत मोदींचे विधान भाजपाच्या जाहीरनाम्याशी जोडले आहे. जर भारताला पाकिस्तानशी संबंध सुधारायची इच्छा होती मग भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात काश्मीरातून कलम ३७० हटवणे का लिहिले होते, भाजपा आणि पंतप्रधान मोदींना वाटते, त्यांच्या अटींवर पाकिस्तानशी संबंध सुधारायला हवेत. काश्मीरचा जो मुख्य मुद्दा आहे त्यातून पाकिस्तानने हटावे. काश्मीर सोडून बोलावे असं भारताला वाटते, परंतु तसे होऊ शकत नाही असं अब्दुल बासित यांनी व्हिडिओत म्हटलं.