'गिफ्टेड नेकलेस' विकून वादात अडकले इम्रान खान; जाणून घ्या, किती रुपयांना विकला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:47 PM2022-04-13T19:47:51+5:302022-04-13T19:50:21+5:30
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी गिफ्ट स्टोरमधील हा नेकलेस अथवा हार विकून मोठे संकट ओढून घेतली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आता एका नव्या आणि मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) त्यांच्याविरोधात एक 'गिफ्टेड नेकलेस' विकल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा नेकलेस अथवा हार 'स्टेट गिफ्ट स्टोअर'शी संबंधित आहे.
18 कोटीं रुपयांत विकला गेला हार -
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी गिफ्ट स्टोरमधील हा नेकलेस अथवा हार विकून मोठे संकट ओढून घेतली आहे. इम्रान खान यांनी आपल्या सर्वात जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या जुल्फी बुखारी यांच्या माध्यमाने हा हार लाहोरमधील एका ज्वेलरला 18 कोटी रुपयांत विकला होता, असे काही वृत्तांत म्हणण्यात आले आहे.
अर्धी किंमत देऊन, घेऊ शकत होते हा हार -
इम्रानन यांना हा हार हवाच होता अथवा विकायचाच होता, तर तयासाठी एक नियम आहे. तज्ज्ञांच्या मते सर्वजनीक गिफ्ट्स अर्धी किंमत देऊन खासगी संपत्ती म्हणून ठेवले जाऊ शकते. मात्र, इम्रान यांनी काही लाख रुपयेच जमा केले, हे बेकायदेशीर होते. यातच, सय्यद जुल्फिकार बुखारी यांनी मंगळवारी, हारासंदर्भात कधीही कसल्याही प्रकारची चर्चा झाली नाही आणि हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रीय खजिन्याचे नुकसान केल्याचा आरोप -
तत्पूर्वी, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात स्टेट गिफ्ट स्टोअरमधून एक मुल्यवान हार विकल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय खजिन्याचे नुकसान केल्याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे, असे वृत्त FIA च्या हवाल्याने आले होते.