तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांची शिक्षा; पत्नीलाही ७ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:51 IST2025-01-17T13:35:47+5:302025-01-17T13:51:25+5:30
पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे

तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांची शिक्षा; पत्नीलाही ७ वर्षांची शिक्षा
Former Pakistan PM Imran Khan: तुरुंगात बंद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शुक्रवारी पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. १९० दशलक्ष पौंडच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुशरा बीबी यांनाही निकालानंतर लगेचच अडियाला तुरुंगातून अटक करण्यात आली. बुशरा बीबी हा निर्णय ऐकण्यासाठी तिथे उपस्थित होत्या. या निर्णयानंतर इम्रान खान समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
तुरुंगात बंद असलेल्या इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्टशी संबंधित जमीन घोटाळ्यात १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खान यांना कनिष्ठ न्यायालयाने ही शिक्षा दिली असून, त्याविरुद्ध ते उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. इम्रान खान व्यतिरिक्त त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय आणि सरकारमध्ये चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेत पाकिस्तानच्या लष्कराचाही सहभाग आहे. कदाचित यामुळे इम्रान खानचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा त्यांच्या पक्षाच्या लोकांना वाटत आहे. मात्र अशातच कोर्टाने इम्रान खान यांना नवी शिक्षा सुनावली. नव्या प्रकरणात शिक्षा सुनावल्याने इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे.
रावळपिंडीच्या कोर्टाने इम्रान खान यांच्या शिक्षेचा निर्णय दिला. इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून अदियाला तुरुंगात बंद आहेत. इम्रान खान यांच्याविरोधातील हा सर्वात मोठा खटला असून, त्यात हा निकाल देण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नसीर जावेद राणा यांनी हा निर्णय दिला. यापूर्वी इम्रान खानला शिक्षेचा निर्णय तीन वेळा पुढे ढकलण्यात आले होते. १३ जानेवारी रोजीही या प्रकरणातील निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी अडियाला कारागृहातच बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या न्यायालयात हा निर्णय देण्यात आला. याप्रकरणी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने डिसेंबर २०२३ मध्ये इम्रान खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने डिसेंबर 2023 मध्ये इम्रान खान, बुशरा बीबी आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर १९० दशलक्ष पौंड (सुमारे ५० अब्ज पाकिस्तानी रुपये) नुकसान केल्याचा आरोप होता. हा पैसा, जो राष्ट्रीय तिजोरी पोहोचला पाहिजे होता, तो वैयक्तिक फायद्यासाठी वापरला गेल्याचा आरोप करण्यात आला.