Imran Khan-Bilawal Bhutto: बिलावल भुट्टोंच्या भारत दौऱ्यावरून इम्रान खान यांचा तिळपापड; म्हणाले, “देशाचा पैसा...”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 10:35 PM2023-05-07T22:35:38+5:302023-05-07T22:36:32+5:30
Imran Khan-Bilawal Bhutto: पाकिस्तान आर्थिक तंगीतून जात असताना पाक पंतप्रधान, मंत्री परदेश दौरे करत असल्यावरून इम्रान खान यांनी सुनावले.
Imran Khan-Bilawal Bhutto: पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो अलीकडेच भारतात आले होते. एकीकडे पाकिस्तानातील आर्थिक संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जीवनावश्यक सर्व गोष्टींसाठी तेथील जनतेची तारेवरची कसरत सुरूच आहे. महागाईच्या बाबातीत आता पाकिस्तानने श्रीलंकेलाही मागे टाकले. अशातच पाकिस्तानचे मंत्री, पंतप्रधान दौऱ्यावर आहेत. यावरून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
भारताच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर बिलावलची देहबोली पाहून असे वाटले की, कदाचित दोन शेजारी देशांमधील संबंध पुन्हा हळूहळू रुळावर आणण्याविषयी ते बोलतील. मात्र, भारत दौरा आटोपून बाहेर पडताच बिलावट भुट्टो यांनी गरळ ओकली होती. भाजप आणि आरएसएस खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरातील सर्व मुस्लिम हे दहशतवादी असल्याचे त्यांना जाहीर करायचे आहे. ते पाकिस्तानी लोकांनाही दहशतवादी म्हणत आहेत. हा खोटारडेपणा संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे बिलावल भुट्टो यांनी म्हटले होते.
इम्रान खान यांचे जोरदार टीकास्त्र
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या लंडनमधील चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेले आहेत. तर, बिलावल भुट्टो यांनी नुकताच भारत दौरा केला. यापार्श्वभूमीवर पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी दोघांवर टीका केली. जगभरात पाकिस्तानची नाचक्की होत आहे. बिलावल भुट्टो तुम्ही संपूर्ण जगाचा दौरा करत आहात. पण त्याआधी सांगा की देशाचा पैसा दौऱ्यावर उडवण्याआधी कोणाला विचारता? या दौऱ्याचा फायदा किंवा तोटा काय? अशी विचारणा इम्रान खान यांनी केली.
दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भुट्टो यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून भुट्टो यांना त्यांच्या पदाप्रमाणे वागणूक दिली गेली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ते आहेत, असा आरोप करत, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, असा पुनरूच्चार जयशंकर यांनी केला.