पाक हादरले! इम्रान खान यांच्यावर गाेळीबार; पायाला लागली गाेळी, हल्लेखाेर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:19 AM2022-11-04T06:19:34+5:302022-11-04T06:19:42+5:30
गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांचा लाँग मार्च वजिराबाद येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर तेथील पंजाब प्रांतातील वजिराबाद येथे लाँग मार्चमध्ये हल्लेखोराने गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या गोळीबारात पीटीआय पक्षाचे एक खासदार फैसल जावेद यांच्या समवेत दाेनजण जखमी झाले आहेत.
गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांचा लाँग मार्च वजिराबाद येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पीटीआयचे नेते इम्रान इस्माईल यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्या दिशेने हल्लेखोराने पिस्तुलाद्वारे नजीकच्या अंतरावरून गोळीबार केला. या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांच्या हत्येचा गुरुवारी प्रयत्न झाला. त्यासंदर्भातील घटनांवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)
कुणामुळे वाचले इम्रान?
इम्रान खान यांच्यावर हल्लेखोराने गोळीबार सुरू केला, त्यावेळी गर्दीत उभा असलेला तरुण समर्थक फरिश्ता ठरला. त्याने हल्लेखोराचा मागून हात धरला आणि त्याचे लक्ष्य चुकले.हल्लेखाेर पळून जात असताना त्या तरुणाने त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. या सगळ्या थराराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर त्या तरुणासाठी ‘पाकिस्तानचा खरा हिरो, सुपरस्टार ऑफ द डे’ असे हॅशटॅग वापरून लोक कौतुक करत आहेत.
अशी झाली हाेती बेनझीरची हत्या
या प्रसंगामुळे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्ताे यांच्या हत्येच्या घटनेची सर्वांना आठवण झाली. २७ डिसेंबर २००७ रोजी भुत्तो यांची रावळपिंडी येथील जाहीर सभेत गोळ्या झाडून हत्या झाली हाेती. आत्मघाती स्फोटही घडविला.