माजी टेनिसस्टार बॉब हेविटला ६ वर्षांचा तुरुंगवास
By Admin | Published: May 19, 2015 01:32 AM2015-05-19T01:32:34+5:302015-05-19T01:32:34+5:30
आॅस्ट्रेलियाचा माजी टेनिसस्टार बॉब हेविट याला ८०च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील आपल्या विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून सोमवारी सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठाण्यात आली.
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण व हल्ला केल्याचा आरोप
जोहान्सबर्ग : आॅस्ट्रेलियाचा माजी टेनिसस्टार बॉब हेविट याला ८०च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील आपल्या विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून सोमवारी सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठाण्यात आली. हेविटवर बलात्कार, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आणि हल्ला केल्याचा आरोप होता. त्याच्यावर हे आरोप २०१३ मध्ये झाले होते.
दक्षिण आफ्रिकेतील साउथ गुआटेंग हायकोर्टात या खटल्याची सुनावणी झाली. २३ मार्चला त्याला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. सोमवारी त्याला शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षेपूर्वी हेविटने आपली प्रकृती आणि वयाचा विचार करण्याची आणि आपल्याला तुरुंगात मारण्याच्या निनावी धमक्या यापूर्वी आल्या आहेत त्याचाही विचार व्हावा, अशी विनंती न्यायालयाला केली. हेविटला २०११ साली हृदयविकाराचा झटका आला होता.
हेविटला या शिक्षेविरोधात अपील करता यावे
यासाठी न्यायालयाने हेविट याच्या जामिनामध्ये आज, मंगळवारपर्यंत वाढ केली आहे. (वृत्तसंस्था)
1दक्षिण आफ्रिकेतील साउथ गुआटेंग हायकोर्टात या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान पीडित महिलेने सांगितले की, ती तरुण असताना हेविट यांनी खासगी कोचिंग देताना तिच्यासोबत गैरव्यवहार केला. काळामुळे गुन्हा संपत नाही, दोषी व्यक्तीला सजा मिळालीच पाहिजे, असे सांगत न्यायमूर्ती बर्ट बाम यांनी हेविटविरोधात सबळ पुरावे असल्याचे म्हटले आहे.
2दुसऱ्या महिलेनेही हेविट यांनी आपल्यावर बलात्कार केला असे सांगितले. ही महिला म्हणाली की, यावेळी हेविट यांनी बलात्कार आनंददायी असतो, असे निर्लज्जपणे त्यावेळी म्हटले होते. आणखी एका महिलेने सांगितले की, ३४ वर्षांपूर्वी ती १२-१३ वर्षांची असताना हेविट यांनी वाईट हेतूने मला स्पर्श करीत माझ्यावर लैंगिक अत्याचार केले होते.
3आॅस्ट्रेलियात जन्मलेल्या आणि दक्षिण आफ्रिकेत आपल्या आयुष्यातील बराच काळ व्यतित केलेल्या हेविट यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्यांना १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल आॅफ फेममध्ये सहभागी करण्यात आले होते; परंतु त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यावर त्यांना यातून वगळण्यात आले होते.