अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, पॉर्न स्टारला पैसे दिल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 06:32 AM2023-04-05T06:32:39+5:302023-04-05T06:33:15+5:30
ट्रम्प टॉवर ते कोर्टापर्यंत ३५ हजार पोलिस तैनात, गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष
न्यूयॉर्क : २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारादरम्यान गप्प राहण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे
दिल्याचा आरोप असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. मॅनहॅटन न्यायालयात त्यांना हजर केले असून, त्यांच्याविरोधात तिथे भारतीय वेळेनुसार रात्री १२ नंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली हाेती.
तसेच ट्रम्प हे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे देशाचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. आपल्यावरील आरोपांचे ट्रम्प खंडन करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. या काेर्टाचे जज डेमाेक्रॅटिक असल्याचा आराेप त्यांच्या मुलाने केला आहे. ट्रम्प कार्टात हजर राहण्यासाठी निघाले तेव्हा रस्त्यांवर त्यांचे हजारो समर्थक होते. ट्रम्प टॉवर ते मॅनहॅटन न्यायालयापर्यंत ३५ हजार पोलिस तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे रूप आले होते.
लेट नाइट अपडेट्स
भारतीय वेळेनुसार रात्री १२:०५ वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्याआधी ११.५५ वाजता त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले.
काय आहे प्रकरण?
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला २०१६ मध्ये १.३ लाख डॉलर्स देण्यात ट्रम्प यांच्या सहभागाच्या चौकशीशी संबंधित हे प्रकरण आहे. ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित लैंगिक संबंधांबाबत शांत राहण्यासाठी डॅनियल्सला हे पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे.
विश्वास होत नाही की हे सारे काही अमेरिकेतच होत आहे. -डोनाल्ड ट्रम्प
सोशल मीडियावर म्हटले... मला ते अटकच करतील
मॅनहॅटन येथील न्यायालयात हजर राहण्यासाठी निघाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, हे तर पक्कच आहे की, ते मला अटकच करतील. जेव्हा ते कोर्टाच्या आवारात पोहोचले तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या चाहत्यांना हात उंचावून विजयाची आशा असल्याची खूण केली.
सुरू केली होती राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या रेसची तयारी...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहटन न्यायालयात फौजदारी खटला चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या नंतर चोवीस तासांत त्यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून ३२ कोटी ८७ लाख रुपये (४० लाख डाॅलर) इतका निधी गोळा केला होता. पण या खटल्याने त्यांच्या या निवडणुकीला बळ मिळणार की त्यांच्या इच्छांवर पाणी फेरले जाणार, हे येणारा काळच ठरवेल.