...अन् आजारी मुलांसाठी बराक ओबामा झाले सांताक्लॉज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 04:18 PM2018-12-20T16:18:22+5:302018-12-20T16:18:31+5:30
अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी रुग्णालयात साजरा केला ख्रिसमस
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अध्यक्ष असताना त्यांनी अनेकदा लहान मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. आताही ते लहान मुलांसोबत ख्रिसमस साजरा करण्यात मग्न आहेत. विशेष म्हणजे यंदाचा ख्रिसमस ते आजारी मुलांसोबत साजरा करत आहेत. वॉशिंग्टनमध्ये एका रुग्णालयातील आजारी मुलांना भेटत त्यांनी भेटवस्तूंचं वाटप केलं. विशेष म्हणजे या मुलांसाठी ओबामा सांताक्लॉज झाले होते.
आठ वर्षे अमेरिकेचे अध्यक्ष राहिलेले ओबामा साध्या कपड्यांमध्ये खांद्यावर बॅग घेऊन रुग्णालयात पोहोचले. ओबामांना पाहून लहान मुलंदेखील खूश झाली. ओबामांनी मुलांना भेटवस्तू दिल्या. त्यानंतर मुलांनी माजी अध्यक्षांसोबत मजामस्ती केली आणि फोटोदेखील काढले. या भेटीचा व्हिडीओ ओबामा यांनी शेअर केला आहे. लहान मुलांसोबत वेळ घालवू दिल्याबद्दल ओबामांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत ख्रिसमसच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
बराक ओबामा सध्या वॉशिंग्टनमध्ये वास्तव्यास आहेत. ते सध्या त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पत्नी मिशेलसोबत शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ख्रिसमस साजरा केला होता. याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात स्वत:च्या पक्षाला बळकटी देण्याचाही प्रयत्न करत आहेत.