चार आखाती देशांनी कतारशी संबंध तोडले
By Admin | Published: June 6, 2017 04:36 AM2017-06-06T04:36:48+5:302017-06-06T04:36:48+5:30
मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी सोमवारी राजनैतिक संबंध तोडले.
दुबई : मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी सोमवारी राजनैतिक संबंध तोडले. या निर्णयामुळे आखातातील अरब देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत.
बहारिन, इजिप्त, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातने कतारशी संबंध तोडल्याची घोषणा करताना आम्ही आमचे राजनैतिक कर्मचारी माघारी बोलावत आहोत, असे सांगितले. एमिरेट्स या विमान कंपनीने कतारमधील विमान सेवा बंद करण्याचे ठरविले असून, त्याची अंमलबजावणी उद्या, मंगळवारपासून होणार आहे.
कतार हा नैसर्गिक वायूने समृद्ध असून २०२२ मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कातारमध्ये १० हजार सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे. सौदी अरेबियाने सध्या येमेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून कतारी सैनिकांच्या तुकड्यांना काढून घेण्यात येईल, असे म्हटले. कातारच्या मुत्सद्यांना हे चारही देश आपल्याकडून काढून टाकणार आहेत. दहशतवादी गटांना पैसा पुरवत असल्याचा कातारने सुरुवातीला इन्कार केला आहे.
हे चारही देश कतारशी हवाई आणि सागरी संपर्क तोडणार आहेत. कतारचे राजे तमीम बिन हमाद अल थानी यांनी २७ मे रोजी इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांची भेट घेऊन त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या फेरनिवडीबद्दल अभिनंदन केले होते. सौदी अरेबिया या भेटीमुळे संतप्त झाला होता. इजिप्तने कतारवर दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला तर बहारिनने कतार व इराण आमच्या देशात घातपाती कारवाया करणाऱ्या गटांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.
>सार्वभौमत्वाचे उल्लंघन - कतार
दोहा : इजिप्त आणि आखातातील तीन देशांनी राजनैतिक संबंध तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर कतारने सोमवारी जोरदार टीका केली. हा निर्णय ‘अन्यायकारक’ असून कतारला राजकीय पालकत्वाखाली आणण्याचा हेतू त्यामागे आहे. उपाययोजना ही अन्यायकारक असून ती खोट्या आणि निराधार दाव्यांवर उभी आहे, असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले. कतारवर पालकत्व लादण्याचा हा उघड प्रयत्न आहे. असा प्रयत्न करणे हेच कतार देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, असे निवेदनात म्हटले.