Death in Canada US Border: कॅनडा-अमेरिकेच्या सीमेवर भीषण थंडीत गोठून चार भारतीयांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:06 PM2022-01-21T22:06:51+5:302022-01-21T22:07:18+5:30
Human Smuggling on Canada US Border: अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका नवजात बाळाचाही समावेश आहे. अमेरिकन पोलिसांनी ही घटना मानवी तस्करीशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
वॉशिंग्टन - अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका नवजात बाळाचाही समावेश आहे. अमेरिकन पोलिसांनी ही घटना मानवी तस्करीशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व मृतक हे भारतातून आले होते. तसेच कॅनडामधून अमेरीकेच्या सीमेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान हवामान बिघडल्यामुळे बर्फाळ प्रदेशात थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
मेनटोबाच्या रॉयल कॅनेडियन माऊंटेन पोलिसांनी सांगितले की, एमर्सनच्या जवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर कॅनडाच्या दिशेला बुधवारी चार मृतदेह सापडले. यातील दोघे प्रौढ, एक तरुण आणि एक नवजात बालक होते. आरसीएमपीचे सहाय्यक आयुक्त जेन मॅक्लेची यांनी सांगितले की, आज मी जी माहिती देणार आहे ती अनेक लोकांना ऐकणे धक्कादायक आहे. निश्चितपणे ही हृदयद्रावक दुर्घटना आहे. प्राथमिक तपासामध्ये या सर्वांचा मृत्यू हा अतिथंड हवामानामुळे झाल्याचे समोर आलं आहे.
मॅक्लेची याने सांगितले की, आरसीएमपीच्या मते चारही मृत हे अमेरिकेच्या सीमेत पकडण्यात आलेल्या एका गटाचा भाग होते. त्यांनी सांगितले की, चारही मृतदेह हे सीमेपासून नऊ ते १२ मीटर अंतरावर सापडले. मेनटोबा आरसीएमपीला अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाकडून बुधवारी एमर्सनच्याजवळ लोकांचा एक गट सीमा पार करून अमेरिकेत आल्याची आणि एका प्रौढ व्यक्तीच्या हातात मुलांच्या उपयोगातील वस्तू आहे. मात्र समुहामध्ये नवजात बाळ नाही आहे, अशी माहिती मिळाली होती.
त्यानंतर सीमेच्या दोन्हीकडून शोधमोहीम सुरू झाली. शोधमोहिमेदरम्यान, दुपारी वयस्कर पुरुष, महिला आणि नवजात बाळाचे मृतदेह सापडले. तर एका तरुणाचा मृतदेह काही वेळाने सापडला. दरम्यान, डिस्ट्रिक्ट ऑफ मिनिसोटाच्या अमेरिकी अटॉर्नी कार्यालयाने गुरुवारी एक पत्रक काढून सांगितले की, या प्रकरणात मानवी तस्करीच्या आरोपीखाली फ्लोरिडामधील स्टीव्ह शेंड याला अटक करण्यात आली आहे.