अमेरिकेत शीख कुटुंबातील चौघांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:14 AM2019-05-02T03:14:53+5:302019-05-02T06:20:36+5:30
गोळीबाराच्या दोन घटनांमुळे दहशत : मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
वॉशिंग्टन : अमेरिकेत एका शीख कुटुंबातील चार सदस्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली, असे वेस्ट चेस्टर पोलीस प्रमुख जोएल हजोंग यांनी सांगितले. ‘माझी पत्नी आणि कुटुंबातील अन्य तीन सदस्य जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. त्यांच्या डोक्यातून रक्त ओघळत आहे. कुणीही बोलत नाही. काही हालचाल करीत नाही, असे या इसमाने ९११ या क्रमांकावर फोन करून पोलिसांना सांगितले.
हकीकत सिंग पनाग (५९), त्यांची पत्नी परमजित कौर (६२), कन्या शालिंदर कौर (३९) आणि एक नातेवाईक अमरजित कौर (५८), अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांची रविवारी रात्री अंदाजे ९.५० च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. या चौघांची हत्याच करण्यात आली.
सर्व जण गोळी लागल्याने मरण पावले आहेत, असे शवविच्छेदन करणाºया एका अधिकाºयाने सांगितले. हत्याकांड घडले त्यावेळी कुटुंबातील कुणीतरी स्वयंपाक करीत असावा. कारण पोलीस जेव्हा वेस्ट चेस्टर अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या लेकफ्रंटमध्ये पोहोचले तेव्हा तेथे शेगडीवर एक डिश ठेवलेली होती. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी पोलिसांच्या संपर्कात आहेत. आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, नवी दिल्ली येथे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी टिष्ट्वट करून या हत्याकांडाची माहिती दिली.
गोळीबारात दोन विद्यार्थी ठार
अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना विद्यापीठात मंगळवारी एका पिस्तूलधारी इसमाने केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार आणि चार जण जखमी झाले. विद्यापीठाच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली. हल्लेखोर हातात पिस्तूल घेऊन सरळ वर्गात घुसला आणि तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांवर त्याने गोळीबार केला. हल्लेखोराला पोलिसांनी जिवंत पकडले आहे.
या घटनेनंतर कॅरोलिना-चॅर्लोट विद्यापीठ बंद करण्यात आले आहे. गोळीबार होताच विद्यार्थ्यांनी सैरावैरा पळत जाऊन सुरक्षित स्थळ गाठले. ‘मोठा आवाज झाला. चार-पाच फैरी झाडल्याचा आवाज. प्रत्येक विद्यार्थी वाट मिळेल तिकडे पळताना मी पाहिले. सर्वच घाबरलेले होते,’असे आपल्या मित्राच्या कला दालनाला भेट देण्यासाठी आलेला २४ वर्षीय अँटोनियो रॉड्रीग्ज याने सांगितले.
कॅम्पस पोलीस प्रमुख जेफ बेकर म्हणाले, ‘एका पिस्तूलधारी हल्लेखोराने अनेक विद्यार्थ्यांना ठार मारले आहे, अशी माहिती देणारा फोन कॉल दुपारी आम्हाला प्राप्त झाला. त्यानंतर पोलीस अधिकारी तात्काळ विद्यापीठाच्या क्लासरूममध्ये दाखल झाले आणि हल्लेखोराला अटक केली. आमचे अधिकारी वेळीच पोहोचल्याने अनेकांचा जीव वाचला. पण तोपर्यंत दोन विद्यार्थी प्राणास मुकले होते. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एक जण किरकोळ जखमी झाला आहे.’ ट्रिस्टन अँड्र्यू टेरेल (२२) असे हल्लेखोराचे नाव आहे.