स्वीत्झर्लंडमध्ये वैयक्तिक वादातून चार जणांची हत्या
By admin | Published: May 10, 2015 11:19 PM2015-05-10T23:19:09+5:302015-05-10T23:19:09+5:30
स्वीत्झर्लंडमध्ये शनिवारी सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्याने आपला सासरा, सासू आणि मेहुण्यासह चार जणांना गोळ्या घालून ठार मारले व आत्महत्या केली.
जिनिव्हा : स्वीत्झर्लंडमध्ये शनिवारी सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्याने आपला सासरा, सासू आणि मेहुण्यासह चार जणांना गोळ्या घालून ठार मारले व आत्महत्या केली. ही माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
झुरीचच्या उत्तर-पश्चिमेला साधारण ३० किलोमीटरवरील साडेचार हजार लोकवस्तीच्या वुरेंलिंजेन (कँटोन आॅफ आरगाऊ) नावाच्या खेड्यात हे हत्याकांड घडले. हे खेडे जर्मन भाषिक आहे. हे हत्याकांड हा दहशतवादाचा प्रकार असल्याचे म्हणता येणार नाही, असे कँटोन आॅफ आरगाऊचे पोलीस प्रमुख मायकेल लिवुपोल्ड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, या हत्याकांडाला वैयक्तिक संघर्षाचे कारण आहे. हल्लेखोराकडे बंदुकीचा परवाना नव्हता व त्याने पोलिसाच्या शस्त्रातून गोळीबार केलेला नाही. त्याला तीन मुले आहेत, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले.
हल्लेखोराचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. हल्लेखोर सुरुवातीला वसाहतीत गेला व त्याने सासरा (५८), सासू (५७) व मेहुणा (३२) यांना गोळ्या घालून ठार मारले व नंतर त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आणखी एका घरात जाऊन ४६ वर्षांच्या व्यक्तीला ठार मारले.
२००७ मध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये स्वीत्झर्लंडमध्ये दर १०० माणसांमागे ४५.७ लोकांकडे बंदूक आहे. ताज्या हत्याकांडानंतर तेथे पुन्हा शस्त्रास्त्र संस्कृतीवर चर्चा सुरू झाली आहे.