अमेरिकेतील चार मजली वृक्षगृह आगीमुळे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 02:08 AM2019-12-08T02:08:32+5:302019-12-08T06:01:36+5:30
अग्निशमन दलाच्या सूचनेमुळे लावले होते कुलूप
अमेरिकेच्या पूर्व टेनेसीत जगातील सर्वात मोठे वृक्षगृह होते. जंगलात असलेले हे चार मजली भव्य वृक्षगृह म्हणजे संपूर्ण लाकूड कामातून तयार केलेला एक बंगला होता. एखाद्या किल्ल्यासारखी त्याची रचना होती. या वृक्षगृहाला नुकत्याच लागलेल्या आगीमुळे तो पुन्हा चर्चेत आला. होरेस बर्गेस नावाच्या व्यक्तीचा हा आगळा प्रकल्प होता. त्यांना हे वृक्षगृह बांधण्यासाठी दोन दशके लागली. त्यांनी १९९० मध्ये हे वृक्षगृह बांधण्यास सुरुवात केली. हे संपूर्ण घर फक्त टाकाऊ लाकडाच्या, बांबूच्या तुकड्यांपासून बनविलेले होते. कोणाकडे बांधकामातून लाकूड शिल्लक उरलेले असेल, तर होरेस बर्गेस ते येथे आणत.
वृक्षगृहाची रचना एखाद्या मिनारासारखी होती. खोल्या, शयनकक्ष, एक स्वयंपाकघर होते. लांबलचक गोल जिना असलेल्या पायऱ्या होत्या. या वृक्षीय नवलाईला भेट देण्यासाठी लोक दूरवरून येत असत. बर्गेस या पाहुण्यांना विनामूल्य पाहू देत. त्यांची ही अजब निर्मिती युवकांमध्ये लोकप्रिय झाली. ही लाकडी इमारत लोकप्रिय असूनही, कदाचित त्याच कारणामुळे राज्य अग्निशमन दलाने अखेर बर्गेस यांना ही इमारत बंद करावी लागेल, असे सांगितले. अखेर २०१२ मध्ये बर्गेस यांनी इमारतीच्या दाराला कुलूप लावण्यात आले.