चार दहशतवाद्यांना पाकिस्तानात फाशी
By admin | Published: April 26, 2017 01:03 AM2017-04-26T01:03:18+5:302017-04-26T01:03:18+5:30
लष्करी न्यायालयांनी दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांत दोषी ठरविलेल्या चार तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने मंगळवारी फाशी दिली.
इस्लामाबाद : लष्करी न्यायालयांनी दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांत दोषी ठरविलेल्या चार तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने मंगळवारी फाशी दिली.
या चौघांना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तुरुंगात फाशी देण्यात आली, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. हे लोक दहशतवादाशी संबंधित घृणास्पद गुन्ह्यात सहभागी होते. निरपराध नागरिकांची हत्या, पाकिस्तानी सुरक्षा दले आणि पोलिसांवरील हल्ल्यांत त्यांचा सहभाग होता, असे ते म्हणाले. रहमान उद दीन, मुश्ताक खान, उबैद उर रहमान आणि जफर इकबाल अशी या चौघांची नावे असून, ते तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. दहशतवादी बदला घेतील या भीतीने लष्करी न्यायालयांचे कामकाज गुप्तपणे चालते. त्यामुळे या दहशतवाद्यांवर कुठे आणि कधी खटला चालला हे कळू शकले नाही.