अंतराळवीर नसूनही चौघे गेले अंतराळात; सामान्यांसाठी मोहीम, तीन दिवस राहाणार अवकाशात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:51 AM2021-09-17T05:51:20+5:302021-09-17T05:51:52+5:30
आपल्याला अंतराळात फिरायला जाता येईल, असा विचार आपल्यापैकी अनेकांनी कधी केलाही नसेल.
फ्लोरिडा : आपल्याला अंतराळात फिरायला जाता येईल, असा विचार आपल्यापैकी अनेकांनी कधी केलाही नसेल. पण आता खरोखरच अंतराळ पर्यटन सुरू झाले असून, गुरुवारी पहाटे अमेरिकेतील फ्लोरिडा येथून चौघे तीन दिवस अंतराळात फिरायला गेले. विशेष म्हणजे त्यांच्यातील एकही जण अंतराळवीर नाही.
इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीने आखलेल्या या मोहिमेद्वारे चौघांना अंतराळात नेले आहे. सामान्यांनाही अंतराळाचा दौरा घडवता येण्याची आपली इच्छा असल्याचे मस्क यांनी जाहीर केले होते. नासाच्या स्पेस रिसर्च सेंटरमधून हे चौघे असलेल्या फाल्कन रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यावर देखरेख स्पेसेक्सच ठेवणार आहे.
कर्करोगाविषयी जागृती
यातून उभ्या राहणा-या पैशांचा विनियोग कर्करोगाविषयी जागृती आणि लहान मुलांतील कर्करोगावर संशोधन करणा-या अमेरिकेतील सेंट ज्यूड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलच्या मदतीसाठी करण्यात येणार आहे.
मोहिमेला नाव इन्स्पिरेशन-४
- या मोहिमेला इन्स्पिरेशन-४ असे नाव देण्यात आले आहे.
- या चौघांना पाच महिन्यांचे प्रशिक्षण मात्र देण्यात आले होते.
- हा तीन दिवसांचा अंतराळ दौरा आहे. हे चौघे जण ३७५ मैल म्हणजेच सुमारे ५७५ किलोमीटर उंचीवर जातील.
- तीन दिवस अंतराळात राहून ते पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील. या मोहिमेचा खर्च प्रचंड असल्याने सर्वांना लगेच अंतराळात जाणे शक्य नाही. पण पुढील पिढ्या मात्र निश्चित अंतराळात जाऊ न येऊ शकतील.