हृदयद्रावक! डोळे उघडले पण सर्वच संपलेलं...; 14 लोकांच्या कुटुंबात फक्त 4 वर्षांची मुलगी जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 03:31 PM2023-10-16T15:31:57+5:302023-10-16T15:33:18+5:30

रुग्णालयामध्ये जेव्हा 4 वर्षांच्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी दु:खद क्षण होता. जखमी मुलीच्या आसपास कोणीही नव्हतं. ती इकडे तिकडे पाहत राहिली पण कोणीच दिसलं नाही.

four year old girl sole survivor of family of 14 in palestine gaza after israel attack | हृदयद्रावक! डोळे उघडले पण सर्वच संपलेलं...; 14 लोकांच्या कुटुंबात फक्त 4 वर्षांची मुलगी जिवंत

फोटो - Reuters

युद्धामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णालयामध्ये जेव्हा 4 वर्षांच्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी दु:खद क्षण होता. जखमी मुलीच्या आसपास कोणीही नव्हतं. ती इकडे तिकडे पाहत राहिली पण कोणीच दिसलं नाही. तिच्या कुटुंबात 14 लोक होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. ती एकटी वाचली आहे. गाझामध्ये इस्रायलने टाकलेल्या बॉम्बमुळे तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. 

फुला अल-लहम नावाची ही मुलगी खान यॉनिस रुग्णालयात दाखल आहे. कुटुंबात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि भावाचा समावेश आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, फुलाच्या घरावर बॉम्ब पडला होता. उम-मोहम्मद अल-लहम, फुलाची आजी, जी दुसरीकडे राहते. आजी सांगते, 'अचानक, कोणताही अलर्ट न देता, त्यांनी घरात राहणाऱ्या लोकांवर बॉम्बफेक केली. माझी नात फुला शिवाय कोणीही वाचलं नाही. ती बोलत नाही, फक्त तिच्या पलंगावर पडून आहे आणि औषधे दिली जात आहेत. फुलाला भाग्यवान मानलं जातं कारण ती वाचली आहे. 

गाझा अधिकाऱ्यांनी सांगितले की शनिवारपासून 2,450 लोक मरण पावले आहेत. यापैकी एक चतुर्थांश मुलं आहेत. याशिवाय सुमारे 10,000 लोक जखमी झाले आहेत. हवाई हल्ल्यात वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. शनिवारी सकाळी 6 वाजता पॅलेस्टाईनमधून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने 20 मिनिटांत इस्रायलवर 5000 रॉकेट डागल्याचा दावा केला होता. 

हमासचे दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी घरे, रस्ते आणि कार्यक्रमांसह सर्वत्र लोकांना गोळ्या घातल्या. हत्येसोबतच दहशतवाद्यांनी लोकांना लुटले. त्यांची घरे जाळली. याशिवाय त्यांनी दीडशेहून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या इस्रायली नागरिकांची संख्या आतापर्यंत 1300 च्या पुढे गेली आहे. तर 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

"कधी बॉम्ब पडेल माहीत नाही, स्वप्नातही सायरनचा आवाज येतो"

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले आहेत. मात्र, भारत सरकार आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत आहे. घरी परतणाऱ्या या लोकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. असाच एक विद्यार्थी म्हणजे विपिन शर्मा जो नुकताच भरतपूरला परतला आहे. युद्धातील दृश्य पाहून विपिन अजूनही घाबरतो. विपिनने सांगितलं की, सायरनचा आवाज ऐकून तो शेल्टरमध्ये जायचा. हे युद्ध एखाद्या दुःखद कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा युद्ध होतं तेव्हा तो खूप घाबरला होता. त्याला स्वप्नातही सायरनचा आवाज यायचा. विपिन हा इस्रायलच्या वेस्ट बँक येथील एरियल विद्यापीठात कॅन्सरवर संशोधन करत आहेत. तो गाझा पट्टीपासून 100 किलोमीटर दूर राहत होता.
 

Web Title: four year old girl sole survivor of family of 14 in palestine gaza after israel attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.