Corona World: मध्य-पूर्वमधील 22 पैकी 15 देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट, WHO ने केले अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:14 PM2021-07-30T12:14:52+5:302021-07-30T12:16:21+5:30
Corona in Middle East: जागतिक आरोग्य संघटनेने या चौथ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला जबाबदार ठरवले आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरिएंटने आता मिडल इस्ट देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं गुरुवारी सांगितलं की, डेल्टा व्हेरिएंटमुळे मिडल इस्टमधील अनेक देश कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहेत. परंतु, या देशांमध्ये संक्रमण आणि मृत्यू लस न घेतल्यामुळे झाल्याचं समोर आलंय.
मिडल इस्टमध्ये कोरोनाची चौथी लाट
मिडल इस्टमधील WHO चे रीजनल डायरेक्टर डॉ. अहमद अल-मंधारी यांनी सांगितलं की, मिडल इस्टमधील 22 पैकी 15 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढले आहेत. या देशांमध्ये लसीकरणाचा वेग कमी असल्यामुळेही कोरोना संक्रमण वाढल्याचं सांगितलं जात आहे. दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत मागच्या महिन्यात या देशांमध्ये संक्रमण 55% ने वाढलयं. तर, मृत्यूच्या आकड्यांमध्येही 15% वाढ झाली आहे.
फक्त 5.5% लोकांचे लसीकरण
WHO ने सांगितल्यानुसार, मिडल इस्टमधील इराण, इराक, ट्यूनिशिया आणि लीबियामध्ये कोरोना संक्रमण सर्वाधिक आहे. मागच्या काही दिवसांपासून रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे मिडल इस्टमधील 4.1 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या फक्त 5.5% आहे.