फ्रान्समध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, इसिसच्या गोळीबारात दोन जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 06:23 PM2018-03-23T18:23:11+5:302018-03-23T18:23:11+5:30
इसिसच्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला केला आहे.
पॅरिस- इसिसच्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला केला आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी भर बाजारात गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना त्यांनी ओलीस ठेवलं आहे. सुरक्षा जवानांच्या माहितीनुसार, सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारे दहशतवादी इसिसशी संबंधित असल्याचा दावा करत आहेत.
फ्रान्सच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार करत या दहशतवाद्यांनी काहींना ओलीस ठेवलं होतं. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. फ्रान्सचं सैन्य दोन ठिकाणी कारवाई करत आहे. एका ट्रिबेस शहराच्या सुपरमार्केटमध्ये काही लोकांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे कॅराकसनमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी आहे.
या दोन्ही घटनांचा आपापसात संबंध आहे की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. सकाळी 11 वाजता हे दहशतवादी सुपरमार्केटमध्ये पोहोचले असून, गोळीबाराचा आवाज ऐकण्यात आला होता. सुपरमार्केटमधल्या आजूबाजूचा परिसर हा बंद करण्यात आला आहे. या दोन्ही दहशतवादी हल्ल्यांचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून फ्रान्सच्या पंतप्रधानांनी गृहमंत्री गेरार्ड कोलांब यांना ट्रिबीसला पाठवले आहे. कोलांब यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. हल्लेखोर दहशतवादी इसिसशी संबंधित असल्याचा त्यांनीच दावा केला आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांकडे एक ते दोन ग्रेनेड सापडले आहेत. तसेच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीरियातल्या हल्ल्याचा मला बदला घ्यायचा आहे, असे दहशतवादी वारंवार बोलत होते.