फ्रान्सला मिळाले सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 06:25 PM2024-01-09T18:25:13+5:302024-01-09T18:27:01+5:30
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 34 वर्षीय गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान घोषित केले आहे.
France Politics: फ्रान्सच्याराजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 34 वर्षीय शिक्षण मंत्री गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान घोषित केले आहे. गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मॅक्रॉन यांनी हा निर्णय घेतला आहे.
एलिझाबेथ बॉर्नची जागा घेतली
गॅब्रिएल अटल यांनी पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची जागा घेतली आहे. एलिझाबेथ बॉर्न यांच्या राजीनाम्याचे कारण नवीन इमिग्रेशन कायद्याबाबत वाढता राजकीय तणाव असल्याचे मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कायद्याचे समर्थन केले होते. राष्ट्राध्यक्षांनी सोमवारी पंतप्रधानांचा राजीनामा स्वीकारला आणि मंगळवारी नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांची मे 2022 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे त्या या पदावर होत्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.
फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान
फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांचा जन्म मार्च 1989 मध्ये झाला आहे. त्यांचे वडील ज्यू वंशाचे आहेत, तर आईचे पूर्वज ग्रीक-रशियन होते. गॅब्रिएल आतापर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या जवळच्या लोकांमध्ये त्यांची गणना होते. ते फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण शिक्षण मंत्री देखील होते. विशेष म्हणजे, गॅब्रिएल अटल समलिंगी असून, त्यांनी सार्वजनिकरित्या हे मान्य केले आहे.