फ्रान्समध्ये गर्भपाताला घटनात्मक अधिकार, असे पाऊल उचलणारा जगातील पहिलाच देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 10:01 AM2024-03-06T10:01:31+5:302024-03-06T10:02:30+5:30

महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारे विधेयक मंजूर होताच संसदेतील सदस्यांनी उभे राहून, या घटनादुरुस्तीचे स्वागत केले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी ही फ्रान्ससाठी अभिमानाची बाब असून, या निर्णयामुळे संपूर्ण जगाला एक संदेश मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

France is the first country in the world to make abortion a constitutional right | फ्रान्समध्ये गर्भपाताला घटनात्मक अधिकार, असे पाऊल उचलणारा जगातील पहिलाच देश

फ्रान्समध्ये गर्भपाताला घटनात्मक अधिकार, असे पाऊल उचलणारा जगातील पहिलाच देश

पॅरिस : देशाच्या राज्यघटनेत महिलांनागर्भपाताचा अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्सच्या संसदेतील सदस्यांनी महिलांना ‘स्वातंत्र्याची हमी’ या १९५८ च्या कायद्यात  ऐतिहासिक सुधारणा करण्यासाठी मतदान केले. संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने ७८० मते पडली, तर विरोधात ७२ मते होती.

महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारे विधेयक मंजूर होताच संसदेतील सदस्यांनी उभे राहून, या घटनादुरुस्तीचे स्वागत केले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी ही फ्रान्ससाठी अभिमानाची बाब असून, या निर्णयामुळे संपूर्ण जगाला एक संदेश मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

जगात अनेक ठिकाणी बंदी
फ्रान्समध्ये घटनादुरुस्तीद्वारे गर्भपात हा महिलांचा घटनात्मक अधिकार असल्याचे घोषित करण्यात आले, याचा अर्थ महिलांना हा निर्णय स्वत:साठी घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. जगात असे अनेक देश आहेत जिथे गर्भपात हा गुन्हा मानला जातो आणि त्यावर बंदी आहे. काही विकसित देशांमध्येही अनेक ठिकाणी गर्भपाताला मान्यता नाही. 

विरोधात कोण?
गर्भपात विरोधी संघटनांनी या सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय व्हॅटिकन या विरोधात आहेत. मानवी आयुष्य संपवण्याचा कोणाला अधिकार नसला पाहिजे, असं व्हॅटिकन इन्स्टिट्यूशनचे म्हणणे आहे. फ्रान्समध्ये १९७५ पासून गर्भपात करणे कायदेशीर आहे. मात्र, लोकांना हा अधिकार राज्यघटनेतून हवा होता.

‘तुमच्या शरीरावर केवळ तुमचाच अधिकार’
ऐतिहासिक घटना दुरुस्तीनंतर पॅरिस येथील आयफेल टॉवरवर रोषणाई करण्यात आली. तसंच ‘माझे शरीर, माझा अधिकार’ हा संदेशही त्यावर लिहिण्यात आला होता. 

तुमचे शरीर हे केवळ तुमचे आहे आणि त्यासाठी इतर कोणी निर्णय घेऊ शकत नाही, असे संसदेत मतदानापूर्वी पंतप्रधान गॅब्रिअल अटाल यांनी सांगितले.
 

Web Title: France is the first country in the world to make abortion a constitutional right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.