रोज ११.५ लाख मास्क तयार करुनही पडताहेत कमी..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 07:37 AM2020-04-25T07:37:33+5:302020-04-25T07:40:18+5:30
फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४० लाख मास्क तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सने आता मास्कची हीच संख्या आठवड्याला ८० लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे ११.५ लाख मास्क तयार केले जातात.
फ्रान्स
फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक अचानक सुरू झाला. तो अजूनही थांबलेला नाही. सुरुवातीच्या काळात असलेला वेग थोडासा मंदावला असला, तरी त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. रुग्णांची संख्या वाढतेच आहे आणि मरणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडते आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या एक लाख २१ हजार होती. ४२,०८८ रुग्ण बरे झाले, तर आजतागायत तब्बल २१,८५६ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.
तिथे डॉक्टर्सची कमतरता आहे. आरोग्य सेवकांचा तुटवडा आहे. उपकरणांचीही फार टंचाई आहे. साधे मास्कही मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळे फ्रान्स सरकारनं युद्धपातळीवर मास्क निर्मितीचा निर्णय घेतला असून, या आठवड्यापासून मास्कनिर्मिती तब्बल चार पटींनी वाढवली आहे. मास्कचा हा आकडाही हादरवणारा आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४० लाख मास्क तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सने आता मास्कची हीच संख्या आठवड्याला ८० लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे ११.५ लाख मास्क तयार केले जातात.
यासंदर्भात फ्रान्सचेच पंतप्रधान एडुआर्ड फिलीप यांनी नुकतेच निवेदन जारी केले आहे की, ‘आमच्याकडे अजूनही मास्कची संख्या अतिशय कमी आहे. प्रत्येक नागरिकाला आम्ही मास्क पुरवू शकत नाही. तरी नागरिकांनी संयम राखावा..!’ त्यामुळे विशेषत: आरोग्य कर्मचाऱ्यांना तरी कोरोनापासून काही काळ दूर ठेवता येईल, असा फ्रान्सचा कयास आहे.
ज्या ज्या पातळीवर जे जे प्रयत्न करता येतील; त्यासाठी फ्रान्स सरकार आणि तिथले संशोधक झगडत आहेत. फ्रान्सच्या संशोधकांनी कोरोना रुग्णांच्या असंख्य तपासण्याही केल्या आहेत. कोरोना विषाणू कसा आणि का पसरतो आहे, यापेक्षाही कोणामध्ये त्याचा प्रसार कमी होतो, कमी झाला आहे, याबाबतचे एक आश्चर्यजनक निरीक्षण त्यांच्या हाती आले आहे. तेथील संशोधकांच्या मते, धुम्रपान करणाºयांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी आहे. तंबाखूमध्ये ‘निकोटिन’ हा जो घटक आहे, त्यामुळे कोरोनाला अटकाव होत असावा, असा त्यांचा कयास आहे.
अर्थातच कोरोनाला रोखण्यासाठी ‘धुम्रपान करा’ असा सल्ला आम्ही देणार नाही; कारण, धुम्रपान करणं अधिक घातक आहे आणि तुमच्या आरोग्याला त्यापासून अधिक हानी पोहोचू शकते,’ असा इशाराही या संशोधकांनी दिला आहे. पॅरीस हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात अभ्यास केला. या अभ्यासगटाचे प्रमुख व न्युरोबायॉलॉजिस्ट जीन पेरी चॅँगुक्स यांनी आपलं निरीक्षण मांडताना म्हटलं आहे की, निकोटीनमुळे शरीरातील इतर पेशींत कोरोनाचा झपाट्यानं प्रसार रोखला जात असावा, असं आम्हाला वाटतंय, पण त्यासंदर्भात अजून संशोधन सुरू आहे.