फ्रान्समध्ये देशव्यापी संप दुसऱ्या आठवड्यातही सुरूच राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:23 AM2019-12-08T01:23:40+5:302019-12-08T01:24:05+5:30
पेन्शन सुधारणांना प्रखर विरोध; संपाने देशात रेल्वे, मेट्रोसेवा ठप्प, १९९५ नंतरचे सर्वांत मोठे आंदोलन
पॅरिस : फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणांना प्रखर विरोध करण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, हे आंदोलन पुढील आठवड्यातही सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. १९९५ नंतरचा हा सर्वांत मोठा देशव्यापी संप आहे. शनिवारी सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या या संपाने देशात रेल्वे, मेट्रो सेवा ठप्प झाल्या. हवाई सेवेवर या संपाचा फार कमी परिणाम झाला. गुरुवारी झालेल्या निदर्शनांत तब्बल आठ लाख लोकांनी सहभाग नोंदवला होता.राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांच्या पेन्शन सुधारणांच्या प्रस्तावित योजनेला संपामुळे आव्हान मिळाले आहे. देशभरात हजारो लोक रस्त्यांवर उतरून निदर्शने करीत आहेत. त्यामुळे परिवहन सेवा ठप्प झाल्या आहेत.
मागील गुरुवारी संपाला सुरुवात झाली. संपाचा प्रभाव एवढा मोठा होता की, त्याने १९९५ च्या मोठ्या संपाच्या आठवणी ताज्या केल्या. तेव्हा तीन आठवड्यांचा संप करण्यात आला होता व तत्कालीन सरकारला सामाजिक धोरण मागे घ्यावे लागले होते.
प्रचंड संख्येने मोर्चे काढणाºया संघटनांनी आता आगामी मंगळवारीही मोठ्या प्रमाणावर देशव्यापी निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
तथापि, मागील तीन दिवसांपासून ठप्प असलेल्या परिवहन सेवेत थोडीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. फ्रान्सच्या विद्यमान सरकारने यापूर्वी यलो वेस्ट आंदोलनाचा सामना केलेला आहे. फ्रान्समध्ये असमानतेच्या विरोधात मागील वर्षी झालेल्या या आंदोलनाने सरकारला हादरवून टाकले होते.
फ्रान्समधील ४२ प्रकारच्या पेन्शन योजना हटवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्या विरोधात जनमानस संतप्त झाले आहे. या सुधारणांमध्ये पेन्शन हे नोकरीच्या कालावधीनुसार मिळणार आहे. सध्या ते शेवटच्या पगाराशी निगडित आहे.