फ्रान्समध्ये दहशतवाद्याच्या मैत्रिणीचा शोध सुरु

By admin | Published: January 11, 2015 12:34 AM2015-01-11T00:34:20+5:302015-01-11T00:34:20+5:30

फ्रान्समध्ये तीन दिवसांच्या रक्तपातात १७ जण मृत्युमुखी पडल्यानंतर शनिवारी सैन्य दलाने अतिरेक्याच्या बंदूकधारी मैत्रिणीचा शोध सुरू केला आहे.

In France, the search for a terrorist girl was started | फ्रान्समध्ये दहशतवाद्याच्या मैत्रिणीचा शोध सुरु

फ्रान्समध्ये दहशतवाद्याच्या मैत्रिणीचा शोध सुरु

Next

अल-काईदाची पुन्हा हल्ल्याची धमकी : ओलिस नाट्य संपले असले तरी हल्ल्याचे संकट कायम, अमेरिकेचा जागतिक धोक्याचा इशारा
पॅरिस : फ्रान्समध्ये तीन दिवसांच्या रक्तपातात १७ जण मृत्युमुखी पडल्यानंतर शनिवारी सैन्य दलाने अतिरेक्याच्या बंदूकधारी मैत्रिणीचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हल्ल्यानंतर जनता हिंसेच्या दहशतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस ओलांद यांनी ओलिस नाट्य संपले असले तरी हल्ल्याचे संकट कायम असल्याचा इशारा दिल्यानंतर अधिकारी हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्याची मैत्रीण हयात बोमोदिनीचा शोध घेत आहेत. बोमोदिनीला ‘सशस्त्र व धोकादायक’ मानले जात आहे. हयात ही सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या अमेडी कौलीबलीची सहकारी आहे. कौलीबली शनिवारी पूर्व पॅरिसमधील एका सुपर मार्केटमध्ये सुरक्षा बलाच्या चकमकीत ठार झाला होता. त्याने सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना ओलिस ठेवले होते.
कौलीबलीने सुपर मार्केटमध्ये चार ओलिसांची हत्या केली होती आणि आपल्या मित्रांना अशाच प्रकारचे हल्ले करण्याचे आवाहन केले होते. दोन्ही ओलिस कमांडो कारवाईद्वारे संपविण्यात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी शनिवारी पहाटे प्रमुख मंत्र्यांची आपत्कालीन बैठक बोलावली होती. यापैकी एका घटनेत दोन भावांनी गेल्या बुधवारी ‘शार्ली हेब्डो’च्या कार्यालयावर हल्ला करून १२ जणांची हत्या केली होती. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जागतिक धोक्याचा इशारा दिला आहे, तसेच जगभरातील आपल्या नागरिकांना ‘दहशतवादी कृत्ये व हिंसा’ यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हा आठवडा फ्रान्ससाठी रक्तपाती ठरला.
दहशतवादी पार्श्वभूमी
तिन्ही कट्टरवाद्यांचा भूतकाळ हा गुन्हेगारी स्वरूपाचा असून या संदर्भातली माहिती फ्रेंच गुप्तचर यंत्रणेला होती. शरीफ क्वाची (३२) हा अट्टल जिहादी म्हणून ओळखला जातो. इराकला दहशतवादी पाठवणाऱ्या नेटवर्कशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला २००८ मध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. शरीफचा भाऊ सईद (३४) हा २०११ साली येमेनला गेला होता. तेथेच त्याने अल् काईदाद्वारे दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते.
(वृत्तसंस्था)

व्यंगचित्र वा एखाद्या ग्रंथापेक्षा इस्लामी दहशतवाद्यांचा इस्लामला मोठा धोका असल्याचे शिया मुस्लिमांची संघटना हिज्बुल्लाने म्हटले आहे. शार्ली हेब्डो या व्यंगचित्र साप्ताहिकावरील हल्ल्याचा निषेध करत संघटनेने या धोक्याकडे लक्ष वेधले.

संघटनेचे नेते सय्यद हसन नसराल्लाह यांनी सांगितले की, एखादा ग्रंथ, चित्रपट वा व्यंगचित्र यातून प्रेषितविरोधी चित्रण केल्यामुळे होणाऱ्या हानीपेक्षा इस्लामी दहशतवादी संघटनांमुळे इस्लामसमोर मोठा धोका उत्पन्न झाला आहे. ते बैरुत येथे बोलत होते. हिज्बुल्लाचा अमेरिकेने दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. दुसरीकडे ही संघटना लेबनॉनमधील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे.
युरोपात एकोप्याची लाट; रविवारी पॅरिसमध्ये रॅली
शार्ली हेब्डोच्या कार्यालयावरील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्ससह युरोपात एकोप्याची लाट उसळली आहे. यादरम्यान, युरोपियन नेते फ्रान्सच्या समर्थनार्थ रविवारी पॅरिस येथील एका रॅलीत सहभागी होऊन एकतेचे प्रदर्शन करणार आहेत. या दहशतवादी हल्ल्याची तीव्रता व भीषणात एवढी तीव्र होती की, पश्चिमेकडील उत्तर कोरिया ते क्युबा आणि इस्रायलपासून इराणपर्यंत सर्वच देशांनी याचा निषेध केला.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि स्पेनचे पंतप्रधान मरिआनो राजोय हे या रॅलीत भाग घेणार आहेत. जर्मनी, इटली, बेल्जियम, पोर्तुगाल, पोलंड, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे व युक्रेन या देशांचे प्रतिनिधीही या रॅलीत भाग घेतील.

वॉशिंग्टन : ‘शार्ली हेब्डो’चे कार्यालय व एका सुपर मार्केटवरच्या हल्ल्यानंतर अरब जगतातील अल काईदाच्या एका म्होरक्याने फ्रान्समध्ये पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. एका चित्रफितीत हारिस अल् नझारीने तुम्हाला युद्ध छेडायचे असेल तर शुभ संदेशाची प्रतीक्षा करा अशी गरळ ओकली आहे. तीन दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये हत्याकांड घडवून आणल्याचे संकेत दिले; मात्र जबाबदारी घेतली नाही.
येमेन सुरक्षा सूत्रांनी व एका वर्गमित्राने सांगितले की, शार्ली हेब्डो हल्ल्यातील एका संशयिताने येमेनमध्ये शिक्षण घेतले होते आणि तेथे त्याने अल काईदाच्या प्रशिक्षण शिबिरातही सहभाग घेतला होता.

टिष्ट्वटरवर अभूतपूर्व ट्रेंड; जिसस शार्ली हॅशटॅगला ५० लाखांहून अधिक टिष्ट्वट
शार्ली हेब्डोच्या कार्यालयावरील हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वटरवर जिसस शार्ली हा हॅशटॅग चालविण्यात येत आहे. या हॅशटॅगने ५ दशलक्षाहून अधिक टिष्ट्वट झाले आहेत, अशी माहिती टिष्ट्वटर फ्रान्सने आज दिली.

उल्लेखनीय बाब म्हणजे, पाच दशलक्ष टिष्ट्वट होणे ही फ्रान्सच्या टिष्ट्वटर इतिहासातली एक अभूतपूर्व घटना आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिसस शार्ली या हॅशटॅगने ५,०४४,७४० वेळा टिष्ट्वट झाले. एका मिनिटाला ६,३०० टिष्ट्वट झाले

अमेरिकेच्या मसुरी येथे गेल्या वर्षी गौरवर्णीय पोलिसांना कृष्णवर्णीय तरुणांवर गोळीबार केला होता. यानंतर अमेरिकेत मोठा जनक्षोभ उसळला होता. फर्गसन या हॅशटॅगने १८,१३६,००० वेळा टिष्ट्वट झाले. हा ट्रेंड अजूनही सुरूच आहे. उल्लेखनीय म्हणजे २०१४ मधील सर्वाधिक टिष्ट्वटचा मान याच हॅशटॅगला मिळाला.

Web Title: In France, the search for a terrorist girl was started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.