भारताची अण्विक ताकद वाढवण्यासाठी फ्रान्स देणार साथ; 'Veto Power' मिळण्यासाठीही समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:47 PM2022-05-05T13:47:32+5:302022-05-05T13:49:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतली फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रों (Emanuel Macron) यांची भेट.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सने अणू पुरवठादार गटात (NSG) भारताच्या समावेशासाठी आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. एनएसजीमध्ये सामील होऊन भारताची अण्विक ताकद झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, दुसरीकडे भारत आणि फ्रान्सने G20 मसुद्याअंतर्गत मजबूत सहकार्य कायम ठेवण्याचेही मान्य केले आहे. NSG मध्ये सामील होण्याच्या आपल्या प्रयत्नांवर निर्णय घेण्यासाठी सदस्य देशांशी चर्चा करणार असल्याचे भारताने म्हटले.
दरम्यान पंतप्रधान मोदी आणि मॅक्रों यांच्यात द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. तसंच भारत फ्रान्स रणनितीक करारासाठी पुढील टप्प्यासाठी एका अंजेंड्यावर सहमतीही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही या भेटीबाबत ट्विट करत भारत-फ्रान्स भागीदारी शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी एक शक्ती असल्याचे म्हटले आहे.
Delighted, as always, to meet my friend President @EmmanuelMacron. We talked at length about bilateral as well as global issues. India and France are proud developmental partners with our partnership spread across different sectors. pic.twitter.com/5Kjqcjf0tQ
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2022
NSG मध्ये ४८ देशांचा समावेश आहे जे आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक सामग्रीच्या व्यापार आणि हस्तांतरणावर नियंत्रण ठेवतात, तसेच अण्वस्त्रांच्या अप्रसारामध्ये सहकार्य करतात. भारताच्या NSG मध्ये सामील होण्यास चीनचा विरोध आहे. चीनच्या विरोधामुळे भारताला या गटात सामील होणे कठीण झाले आहे. याशिवाय फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना आणि भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रों यांच्या भेटीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
भारत दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करत आहे आणि भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास पात्र आहे. सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य आहेत. रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका हे त्याचे स्थायी सदस्य आहेत. केवळ या स्थायी सदस्यांकडेच व्हिटो पॉवर आहे. याद्वारे कोणताही निर्णय होऊ देणं किंवा होऊ न देण्याचा अधिकार मिळतो.