१०० वर्षांच्या बंदीनंतर 'ती' पुन्हा मुक्त; निमित्त ठरलं ऑलिंपिकचं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:30 AM2023-07-19T10:30:03+5:302023-07-19T10:30:43+5:30

ज्या सीन नदीनं फ्रान्सच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात मोलाचं योगदान दिलं, त्याच सीन नदीचं वास्तव.

Free again after 100 years of ban; The reason was the Olympics seen river | १०० वर्षांच्या बंदीनंतर 'ती' पुन्हा मुक्त; निमित्त ठरलं ऑलिंपिकचं

१०० वर्षांच्या बंदीनंतर 'ती' पुन्हा मुक्त; निमित्त ठरलं ऑलिंपिकचं

googlenewsNext

सीन नदी ही फ्रान्समधून वाहणारी प्रमुख नदी. फ्रान्सची राजधानी पॅरिस याच नदीकाठी वसलेलं आहे. फ्रान्सच्या सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीत या नदीचं महत्त्व खूप मोठं आहे. फ्रान्समध्ये पुढील वर्षी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या नदीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झालं आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पॅरिस आणि संपूर्ण फ्रान्समध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. देशविदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू पर्यटक यांच्या स्वागतासाठी आणि त्यांची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. येणारा प्रत्येक खेळाडू आणि पर्यटक या नदीच्या प्रेमात पडावा, यादृष्टीनंही नियोजन सुरू आहे.

ज्या सीन नदीनं फ्रान्सच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात मोलाचं योगदान दिलं, त्याच सीन नदीचं वास्तव. मात्र गेली कित्येक वर्षे अतिशय दयनीय होत. सीन नदीच्या परिसरात उभे राहिलेले प्रचंड मोठमोठे कारखाने, त्यातून होणारं प्रदूषण, कारखान्यांतून निघणारं रसायनयुक्त पाणी, इमारतींमधून बाहेर पडणारे सांडपाणी या साऱ्या गोष्टी सीन नदीला मिळत होत्या. याशिवाय शेवाळ आणि पाणवेलीमुळे ही नदीच जणू काही लुप्त झाली होती. त्यामुळे या नदीचं पाणी पिण्याच्या लायकीचं तर सोडा, पण साधं वापरण्यायोग्यही राहिलं नव्हतं.

या नदीच्या पाण्यात बुडायला, अंघोळ करायलाही त्यामुळे मनाई करण्यात आली होती, इतकं हे पाणी अस्वस्छ आणि गलिच्छ झालं होतं. ज्या सीन नदीनं फ्रान्सला प्रगतीचे, विकासाचे दिवस दाखवले, ज्या सीन नदीच्या पाण्यानं एकेकाळी फ्रान्सला अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू मिळवून दिले, त्याच सीन नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी किंवा स्विमिंगसाठी उतरण्यासही मज्जाव करण्यात आला होता. 

किती वर्षांपासून हे निर्बंध असावेत? सीन नदीच पाणी खराब झाल्यामुळे गेली तब्बल शंभर वर्षे या नदीच्या पाण्यात उतरण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली होती! आश्चर्याची गोष्ट म्हणजे सन १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये याच सीन नदीत ऑलिम्पिकचे अनेक इव्हेंट घेण्यात आले होते प्रदूषण वाढल्यामुळे बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे सन १९२३ मध्ये लोकांना या नदीच्या पाण्यात उतरण्यास आणि बोटिंग करण्यासही बंदी घालण्यात आली होती. या नदीचं पाणी स्वच्छ करावं, तिथलं प्रदूषण कमी करावं, यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत होते, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही.

आता ऑलिम्पिकच्या निमित्तानं मात्र सीन नदीचं संपूर्ण पात्रच स्वच्छ आणि प्रदूषणरहित करण्याचा विडा फ्रान्स सरकारनं उचलला आणि त्याप्रमाणे त्यांनी करूनही दाखवलं. गेल्या शतकभरापासून जणू मृत पावलेली ही नदी आता पुन्हा जिवंत झाली असून तिला जीवदान मिळाले आहे. ही नदी आता पूर्वीच्याच उत्साहानं आणि नितळ पाण्यानं खळखळत वाहताना दिसेल. नागरिकांना त्यामुळे अत्यानंद झाला आहे. या नदीत आता आंघोळीला आणि पोहायलाही परवानगी मिळाली आहे. ऑलिम्पिकच्या निमित्तानं अनेक जलतरणपटूंनी या नदीत सरावाला सुरुवातही केली आहे. एवढच नाही, नदीचे सौंदर्य पुन्हा खुलल्यामुळे नदीकाठचं चैतन्यही बहरलं आहे.

सीना नदीकाठी अनेक टुरिस्ट स्पॉट्सही डेव्हलप करण्यात आले आहेत. 
नदी परिसरातील अनेक साइट्सवर प्रत्यक्ष पाण्यात उतरण्यासाठी अजून नागरिकांना मनाई असली, तरी ऑलिम्पिकनंतर २०२५मध्ये मात्र सर्वसामान्यांनाही ही नदी खुली केली जाईल. सध्या तरी जलतरणपटूंना सरावासाठी ही नदी मोकळी करून दिली आहे. ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशनच्या सरावासाठी आम्हाला त्याचा खुपच फायदा होईल, असं अनेक जलतरणपटूंनी बोलून दाखवलं आहे. नदीकाठी आताच अनेक उपक्रम राबवले जात असून पर्यटक तिथे गर्दी करू लागले आहेत. प्रेमीयुगुलांचा कट्टा म्हणूनही सीन नदीकाठचा परिसर प्रसिद्ध होऊ लागला आहे. 

सांस्कृतिक वैभव पुन्हा लखलखित !

पॅरिसच्या महापौर अनी हिदाल्गो यानी म्हटलं आहे, सीन नदीच्या रूपान आमचं सांस्कृतिक वैभव आम्ही आता पुन्हा अभिमानानं मिरवणार आहोत. ऑलिम्पिक संपल्यानंतर लोकांसाठी असलेले सारे निबंध लवकरात लवकर उठवले जातील, ग्लोबल वॉर्मिंगचेही जोरदार फटके फ्रान्स आणि पॅरिसला बसताहेत. सन २०५०पर्यंत पॅरिसचं तापमान ५० अंशांच्याही पुढे जाईल, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यावेळी हीच सीन नदी लोकांसाठी जीवनदायी म्हणूनही काम करील!...
 

Web Title: Free again after 100 years of ban; The reason was the Olympics seen river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.