स'हृदय' भारत! पाकिस्तानी हॉकीपटूच्या शरीरात धडकणार भारतीय हृदय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 11:02 AM2018-04-27T11:02:02+5:302018-04-27T11:02:02+5:30
पाकिस्तानचा विश्वविजेता हॉकीपटू आणि भारताविरोधात नेहमीच चांगली कामगिरी करणारा गोलरक्षक मन्सूर अहमद याच्या शरीरात लवकरच एक भारतीय हृदय धडकणार आहे.
मुंबई - पाकिस्तानचा विश्वविजेता हॉकीपटू आणि भारताविरोधात नेहमीच चांगली कामगिरी करणारा गोलरक्षक मन्सूर अहमद याच्या शरीरात लवकरच एक भारतीय हृदय धडकणार आहे. पाकिस्तानचा हा 49 वर्षांचा हॉकीपटू हृदयरोगाने पीडित असून, त्याला हृदय प्रत्यारोपनाची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्याला उपचारांसाठी वैद्यकीय व्हिसा मिळावा, असे आवाहन भारत सरकारला केले होते. आता फोर्टिस ग्रुप हॉस्पिटलने त्याला मुंबई आणि चेन्नई येथे हृदय प्रत्यारोपण आणि मोफत उपचार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
मन्सूर सध्या कराची येथील जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेत आहे. त्याला हृदयात असलेल्या पेसमेकर आणि स्टेंटबाबत त्रास होत आहे. मात्र, ''आपल्याला आर्थिक मदतीची गरज नाही. तर केवळ उपचारांसाठी भारताचा वैद्यकीय व्हिसा मिळावा,'' असे मन्सून अहमदने म्हटले आहे. अहमद याला डॉक्टर चौधरी परवेझ यांनी भारतात उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. अहमद आणि त्याच्या डॉक्टरांना पाकिस्तानी नागरिकांना उपचारांसाठी भारताकडून सहानुभूतीपूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे.
अहमदच्या हृदय प्रत्यारोपणासाठी आम्ही मुंबई आणि चेन्ई येथे नोंदणी करणार आहोत.भारत सरकारकडून अहमद याला भारतात येण्याची परवानगी मिळाल्यानंतर या प्रवासासाठी तो या प्रवासासाठी तंदुरुस्त आहे याची आम्ही चाचपणी करू, असे फोर्टिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मन्सूर अहमद याने 1986 ते 2000 या काळात पाकिस्तानकडून 338 सामने खेळले होते. तसेच 1994 साली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.