"पश्चिम बंगालला मोदींच्या सत्तेपासून मुक्त करा,स्वातंत्र्याची घोषणा करा’’, बांगलादेशी दहशतवाद्याचं ममता बॅनर्जींना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:16 PM2024-09-14T12:16:12+5:302024-09-14T12:28:08+5:30
Bangladesh Terrorist Jashimuddin Rahmani News: सत्तांतरानंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारने बांगलादेशमधील कट्टरतावादी दहशतवादी जसीमुद्दीम रहमानी याला तुरुंगातून मु्क्त केले होते. आता अल कायदाशी संबंधित असलेला हाच रहमानी भारताविरोधात गरळ ओकत आहे.
आरक्षणावरून सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये सत्तांतर होऊन आता महिना उलटला आहे. मात्र या सत्तांतरानंतरही बांगलादेशमध्ये अनेक उलथापालथी होत आहेत. दरम्यान, सत्तांतरानंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारने बांगलादेशमधील कट्टरतावादी दहशतवादी जसीमुद्दीम रहमानी याला तुरुंगातून मु्क्त केले होते. आता अल कायदाशी संबंधित असलेला हाच रहमानी भारताविरोधात गरळ ओकत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना आश्रय देण्यावरून एका व्हिडीओमधून रहमानी याने शेख हसिना यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही व्हिडीओमधून धक्कादायक असं आवाहन केलं आहे.
एबीटीचा प्रमुख असलेल्या रहमानी याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच त्यामध्ये तो काश्मीरच्या स्वातंत्र्याबाबत बोलताना दिसत आहे. तसेच पश्चिम बंगाललाहीभारतापासून वेगळे करण्याबाबत मुक्ताफळे उधळत आहे. त्याने पश्चिम बंगालला मोदींच्या सत्तेमधून मुक्त करण्याचं आणि स्वातंत्र्याची घोषणा करण्याचं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केलं आहे.
रहमानी हा बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात होता. मात्र बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रहमानी याची मुक्तता केली होती. तेव्हापासून तो भारताविरोधात वक्तव्य करत आहे. दरम्यान, याआधी रहमानी याने भारताचं चिकन नेक समजल्या जाणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरला कापून पूर्वोत्तर राज्यांना देशाच्या इतर भागापासून तोडण्यासाठी चीनला मदत करण्याबाबतही विधान केलं होतं. तसेच बांगलादेशविरोधात कुठलाही आक्रमक कारवाई करण्याविरोधात भारताला धमकी दिली आहे. बांगलादेश हा सिक्कीम किंवा भूतानसारखा नाही. हा १८ कोटी मुस्लिमांचा देश आहे, असा दावा त्याने केला आहे.