"लहान मुलांना गप्प बसवण्यासाठी हमासचे दहशतवादी बंदूकीचा धाक दाखवायचे, मारायचे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:59 IST2023-11-30T15:58:34+5:302023-11-30T15:59:57+5:30
सुटका झालेल्या ओलिसांनी सांगितले अंगावर काटा आणणारे अनुभव

"लहान मुलांना गप्प बसवण्यासाठी हमासचे दहशतवादी बंदूकीचा धाक दाखवायचे, मारायचे"
Israeli Hostages Story, Hamas Gaza: गाझामध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या युद्धविराम करारांतर्गत इस्रायलने हमासच्या वतीने ओलीस ठेवलेली मुले आणि महिलांची सुटका केली. ओलिसांची प्रकृती ठीक आहे आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्यांनंतर सर्वांना घरी पाठवले जात आहे. परंतु हमासच्या बंदिवासात त्यांना भयानक अनुभव आले आहेत. या लोकांना यातून बाहेर यायला खूप वेळ लागू शकतो कारण या अपघाताचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. हमासच्या कैदेतून सुटलेल्या महिला आणि मुलांनी जे सांगितले ते भयावह आहे. गाझामधील बोगद्यात कैद असलेल्या या लोकांना लहान मुलांना रडवण्याइतपत मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर हमासच्या हल्ल्याचे व्हिडिओही त्यांना जबरदस्तीने दाखवण्यात आले. अशा परिस्थितीत या लहान मुलांचे रडणे बंद करण्यासाठी त्यांना चक्क बंदुकीचा धाक दाखवण्यात आल्याचे यापैकी काही ओलीसांनी सागितले.
हमासने १२ वर्षीय इतान याहलोमी आणि ९ वर्षीय एमिली हँड यांना गाझामध्ये ५० दिवसांपर्यंत ओलीस ठेवले होते. इतानवर वारंवार अत्याचार करण्यात आले आणि हमासच्या हल्ल्यांचे व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले गेले. त्याला पुन्हा पुन्हा मारहाण झाली, म्हणून आताही हे सर्व आठवून तो रडू लागतो असे काही लोक सांगतात. ९ वर्षीय एमिलीचे वडील सांगतात की, घरी परतल्यानंतरही ती खूप हळू बोलते आणि गप्प गप्पच असते. मोठा आवाज झाला की तिला भीती वाटते. त्यांच्या बंदिवासात हमासचे दहशतवादी त्यांना आवाज नको म्हणून घाबरवायचे, त्यामुळे आजही आवाजाची त्यांना भीती वाटते.
बंदुकीच्या धाकात ठेवायचे
हमासच्या बंदिवासातून सुटलेले ओलिस त्यांचे गेल्या 50 दिवसांचे अनुभव कथन करत आहेत. ओलिसांना अन्न देण्यासाठी तासन्तास वाट पाहायला लावले जायचे आणि जेव्हा ते भूकेनी व्याकुळ व्हायचे तेव्हा त्यांना थोडंसं खाणं दिलं जायचं. झोपण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी योग्य जागा नसल्याने अनेक वेळा शौचालयासाठी बराच वेळ थांबावे लागायचे. या सर्व प्रकारानंतर कोणी तक्रार केली तर हमासचे दहशतवादी त्यांना बंदुकीचा धाक दाखवायचे आणि बंदुकीने मारहाण करून घाबरवायचे, असेही काहींनी सांगितले.
----------------------