फ्रान्सचा इसिसवर पलटवार!
By Admin | Published: November 17, 2015 03:38 AM2015-11-17T03:38:59+5:302015-11-17T03:38:59+5:30
संपूर्ण जगाची झोप उडविणाऱ्या पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्यांचे सूत्र बेल्जियमचा नागरिक असलेल्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस)च्या हस्तकाने सीरियात
पॅरिस : संपूर्ण जगाची झोप उडविणाऱ्या पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्यांचे सूत्र बेल्जियमचा नागरिक असलेल्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस)च्या हस्तकाने सीरियात बसून हलविल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
एकीकडे, हल्ल्यानंतर स्वत:ला स्फोटकांनी उडवून देणाऱ्या सात हल्लेखोरांपैकी पाच हल्लेखोरांची ओळख पटली असून, त्यातील चार फ्रान्सचेच नागरिक होते तर एक सीरियाचा होता. दुसरीकडे या हल्ल्यांचा प्रतिशोध घेण्यास फ्रान्सच्या हवाई दलाने ‘इसिस’च्या सीरियातील राक्का या मुख्यालयावर प्रचंड हवाई हल्ले करून दहशतवादाविरुद्धची लढाई शत्रूच्या बालेकिल्ल्यात जाऊन लढण्याचा पक्का इरादा जाहीर केला आहे. कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी देशात न भुतो अशी कारवाई करीत फ्रेंच पोलिसांनी २३ संशयितांना तर ब्रुसेल्स पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. (वृत्तसंस्था)
१६८ ठिकाणी छापे
फ्रेंच पोलिसांनी रविवारी रात्रभर देशभरात एकूण १६८ ठिकाणी छापे टाकून २३ जणांना अटक केली व रॉकेट लॉन्चर्ससह अनेक अत्याधुनिक शस्त्रे व स्फोटके हस्तगत केली. याखेरीज विविध ठिकाणी एकूण १०४ संशयितांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
बेल्जियममध्ये सात संशयित ताब्यात
तिकडे बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हल्ल्यांमागचा मुख्य सूत्रधार हा बेल्जियन नागरिक असल्याचेही तेथील पोलिसांनी केलेल्या तपासातून पुढे आले आहे. याखेरीज हल्लेखोरांनी पॅरिसला जाण्यासाठी वापरलेल्या दोन मोटारी ब्रुसेल्समधून भाड्याने घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.
शस्त्रे, दारूगोळ्याचे गोदाम उद््ध्वस्त
राक्का ही ‘इसिस’ची राजधानी असल्याचे मानले जाते. फ्रेंच हवाई दलाच्या १० विमानांनी रविवारी रात्री राक्कावर तुफान बॉम्बफेक करून ‘इसिस’चे मुख्य भरती केंद्र व शस्त्रे आणि दारूगोळ्याचे मोठे गोदाम उद््ध्वस्त केल्याचे फ्रेंच संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
राक्कावर केलेले हवाई हल्ले ही ‘इसिस’विरुद्धच्या लढाईची केवळ सुरुवात आहे व ही लढाई या राक्षसी संघटनेचा खात्मा करूनच संपेल, असा निर्धार फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल वॅले यांनी जाहीर केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीही ‘इसिस’वरील हवाई हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे.
मात्र ओळख पटलेल्या मृत हल्लेखोरांपैकी एक जण सीरियन निर्वासितांच्या लोंढ्यात मिसळून आल्याचे संकेत मिळाल्याने या निर्वासितांना थारा देण्याच्या बाबतीत युरोपीय देशांची भूमिका अधिक ताठर होण्याची चिन्हे आहेत.
‘इसिस’ हा इस्लामला कलंक : इसिस ही संघटना इस्लामवरील कलंक असून, प्रत्येकाने पॅरिसमधील हल्ल्याचा निषेध करावा. या हल्ल्याचा संबंध कोणत्याही धर्माशी न जोडता दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जगाने एकजूट दाखवावी, अशी ठाम भूमिका एमआयएमचे अध्यक्ष खा. असादुद्दीन ओवैसी यांनी घेतली आहे. इसिसच्या कारवायांचा इस्लामशी काहीही संबंध नाही हे जगाने समजून घ्यावे, असेही ते म्हणाले.
वॉशिंग्टन उडवू : सीरियावरील हवाई हल्ले सुरू ठेवल्यास
आम्ही वॉशिंग्टनही उडवू, अशी धमकी इसिसने व्हिडीओद्वारे दिली आहे. अमेरिकेसह हल्ल्यांमध्ये सहभागी देशांनाही परिणाम भोगावे लागतील.
कोण होते हल्लेखोर?
१. बिलाल हादफी-फ्रेंच नागरिक
२. इब्राहीम अब्देसलाम-
फ्रेंच नागरिक
३. इस्माईल ओमर मोस्तेफई-
फ्रेंच नागरिक
४.सॅमी अॅमीमोर-
फ्रेंच नागरिक
५. अहमद अल मोहम्मद- संशयित सीरियन नागरिक