PLAYBOY मासिकावर महिला मंत्र्याचा फोटो; प्रचंड खळबळीनंतर म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:40 PM2023-04-04T12:40:21+5:302023-04-04T12:40:56+5:30
मार्लीन स्किआपा यांनी प्लेबॉय मासिकाच्या एप्रिल अंकासाठी फोटोशूट केले. हा मासिकाचा कव्हर फोटो मासिकाच्या फ्रेंच भाषेतील आवृत्तीसाठी आहे.
फ्रान्समधील सामाजिक अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मार्लीन स्किआपा मोठ्या वादात सापडल्या आहेत. दरम्यान, मार्लीन स्किआपा यांनी 'प्लेबॉय' मासिकाच्या कव्हर पेजसाठी आपले फोटोशूट केले. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मार्लीन स्किआपा यांचे विरोधकच नव्हे तर मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज झाले आहेत. मार्लीन स्किआपा यांनी प्लेबॉय मासिकाच्या एप्रिल अंकासाठी फोटोशूट केले. हा मासिकाचा कव्हर फोटो मासिकाच्या फ्रेंच भाषेतील आवृत्तीसाठी आहे.
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनीही मार्लीन स्किआपा यांच्या फोटोशूटच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाल्या, "त्यांचा निर्णय योग्य नाही. विशेषतः सध्याच्या काळात." दुसरीकडे, ग्रीन पार्टीचे खासदार सँड्रीन रोसो यांनीही सध्याच्या परिस्थितीत फोटोशूट केल्याप्रकरणी मार्लीन स्किआपा यांच्यावर नाराजी व्यक्ती केली आहे. एका टीव्ही चॅनलला त्यांनी सांगितले की, "महिला कुठेही आपले शरीर दाखवू शकतात, मला त्यात काही अडचण नाही, पण एक सामाजिक परिस्थिती असते."
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. कामगार संघटना अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रस्तावित पेन्शन सुधारणा योजनेला विरोध करत आहेत, ज्या अंतर्गत निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या निषेधाच्या दरम्यान मार्लीन स्किआपा आपल्या फोटोशूटच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "महिलांना त्यांच्या शरीरासोबत वाट्टेल ते करण्याच्या अधिकाराचे मी समर्थन करते. सर्वत्र आणि प्रत्येक वेळी. फ्रान्समध्ये महिला मुक्त आहेत. तर यामुळे परंपरावादी आणि भोंदूंचा राग असो वा नसो."
मार्लीन स्किआपा यापूर्वीही सापडल्या होत्या वादात
मार्लीन स्किआपा यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या महिलांच्या हक्कांसाठी लिहित होत्या. त्या अनेकदा टीव्ही शोमध्ये दिसून येत होत्या. 2010 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिले. यामध्ये जास्त वजन असलेल्या लोकांना 'सेक्स टिप्स' देण्यात आल्या होत्या. यावर टीकाकारांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच, 2017 मध्ये त्यांच्यावर पॅरिसच्या एका भागात जाण्याचा आरोप होता, जिथे कथितपणे महिलांना मनाई आहे.