कट्टर मुस्लिम इमामांना फ्रान्समध्ये थारा नाही - फ्रान्सच्या मंत्र्यांचा इशारा
By admin | Published: November 16, 2015 04:12 PM2015-11-16T16:12:33+5:302015-11-16T16:44:26+5:30
पॅरिसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सने इसिसविरोधात मोहिम उघडली असून कट्टर मुस्लिम इमामांना फ्रान्समध्ये थारा नसल्याचे फ्रान्सच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. १६ - इसिसच्या आत्मघातकी हल्लेखोरांनी पॅरिसमध्ये सहा ठिकाणी केलेल्या युद्धसदृश हल्ल्यातील नरसंहारामुळे फ्रान्ससह अवघे जग हादरले असून फ्रान्सने इसिसविरोधात मोहिम सुरू करत फ्रान्सच्या सीरियातील रक्का येथे इसिसच्या तळांवर दहा ठिकाणी हल्ला केला आहे. दरम्यान कट्टर मुस्लिम इमामांना फ्रान्समध्ये थारा दिला जाणार नसून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे फ्रान्सच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. अब्देलहमीद अबौद हा बेल्जियम नागरिक या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती फ्रान्सच्या अधिका-यांनी दिली आहे.
शुक्रवारी पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात सुमारे १२८ जण ठार झाले शेकडो जण गंभीर जखमी झाले. या जिहादी हल्ल्यामुळे हादरलेल्या फ्रान्सने हल्लेखोरांचा एकजुटीने मुकाबला करत त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे. त्या पार्श्वभूमीवरच फ्रेंच सरकारने हल्लेखोरांच्या शोधार्थ संपूर्ण फ्रान्समध्ये १६८ ठिकाणी छापे मारले असून आत्तापर्यंत १०४ जणांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती फ्रान्सच्या मंत्र्यांनी दिली आहे.
पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री इसिसच्या दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून ३५२ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असून विविध देशांमध्ये या हल्ल्याची पाळेमुळे रुजली असावी अशी शक्यता आहे. हल्ला करणा-या सात पैकी सहा दहशतवाद्यांनी स्वतःला उडवून घेतले होते. तर एका दहशतवाद्याला पोलिसांनी कंठस्नान घातले.