फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं गाझामध्ये युद्धविरामाचं आवाहन, बेंजामिन नेतन्याहूंनी दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 01:57 PM2023-11-11T13:57:42+5:302023-11-11T13:58:09+5:30
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं आहे. एका परदेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी यावर भाष्य केलं. "इस्रायलनं गाझावर बॉम्ब हल्ले करणं आणि नागरिकांची हत्या करणं बंद केलं पाहिजे," मॅक्रॉन म्हणाले. याशिवाय युद्धबंदीचा इस्रायललाच फायदा होईल असंही त्यांनी नमूद केलं.
फ्रान्स हमासच्या 'दहशतवादी' कृत्यांचा स्पष्टपणे निषेध' करतो. परंतु इस्रायलचा 'स्वसंरक्षणाचा अधिकार' ओळखून आम्ही त्यांना गाझामधील बॉम्बहल्ले थांबवण्याची विनंती करतो, असंही मॅक्रॉन म्हणाले. अमेरिका आणि ब्रिटनसह इतर जागतिक नेत्यांनी युद्धविरामाच्या आवाहनात सामील व्हावं अशी त्यांची इच्छा आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर "मला आशा आहे की ते असं करतील," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली.
... ते योग्य ठरवता येणार नाही
गाझातील सर्व नागरिकांचे हमासशी संबंध नाहीत. निरपराध नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्धबंदीशिवाय दुसरा मार्ग नाही. प्रत्यक्षात बॉम्बहल्ल्यात नागरिकांचा बळी जात आहे. या मुलांवर, या महिलांवर, या वृद्धांवर हल्ला करण्याचं कारण नाही आणि त्याचं समर्थनही करता येणार नाही. त्यामुळे आम्ही इस्रायलला हे थांबवण्याची विनंती करतो, असं त्यांनी नमूद केलं.
हमासचा निषेध करा - नेतन्याहू
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. अमेरिका, युरोप आणि मध्य आशियासह जगातील अनेक देशांनी इस्रायलवर गाझामधील कारवाया कमी करण्यासाठी दबाव आणला आहे. पण गाझा स्थित अतिरेकी संघटना हमास पुन्हा एकत्र येण्यासाठी युद्धबंदीचा फायदा घेतील असं त्यांचं म्हणणं आहे. मॅक्रॉन यांच्या वक्तव्यानंतर एका निवेदनाद्वारे इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रत्युत्तर दिलं. जागतिक नेत्यांनी इस्रायल नव्हे तर हमासचा निषेध केला पाहिजे. हमास आज गाझामध्ये करत असलेल्या या कारवायांची उद्या पॅरिस, न्यूयॉर्क आणि जगात कुठेही पुनरावृत्ती होऊ शकते, असं ते म्हणाले.