फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला म्हटलं 'डिलिशियस'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 06:37 PM2018-05-02T18:37:31+5:302018-05-02T18:37:31+5:30
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहेत. ऑस्ट्रेलियात इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं जंगी स्वागतही करण्यात आलंय.
कॅनबेरा- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहेत. ऑस्ट्रेलियात इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं जंगी स्वागतही करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मेल्कम टर्नबुल यांनी स्वतः इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पाहुणचार केला असून, मेल्कम टर्नबुल यांनी केलेला पाहुणचार पाहून इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली.
तसेच पत्रकार परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मेल्कम टर्नबुल आणि त्यांच्या पत्नीचं विशेष कौतुक केलं. परंतु त्याच वेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मेल्कम टर्नबुल यांच्या पत्नीला डिलिशियस असं संबोधलं. इमॅन्युएल मॅक्रॉन टर्नबुल यांना उद्देशून म्हणाले, मी या आदरातिथ्य आणि पाहुणचारासाठी तुमचं आणि तुमच्या डिलिशियस पत्नीचे विशेष आभार मानू इच्छितो. मॅक्रॉन यांनी टर्नबुल यांची पत्नी लूसी यांना डिलिशियस म्हटल्यानं सिडनीतल्या लोकांच्या भुवया उंचावल्या.
काहींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी ते अनवधानानं बोलून गेल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावरही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विधानाच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर त्यांनी यावर खुलासा केली आहे. मला डिलिशयस नव्हे, तर फ्रेंच शब्दानुसार डिलिशिया म्हणायचं होतं. फ्रेंचमध्ये डिलिशियाचा अर्थ मनोहर असा आहे, असंही स्पष्टीकरण इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलं आहे.