55 वर्षांचा फ्रेंच स्पायडरमॅन दक्षिण कोरियातील पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 12:23 PM2018-06-06T12:23:45+5:302018-06-06T13:00:07+5:30

रॉबर्टने आजवर 100 हून अधिक उंच इमारतींवर दोरी व इतर साहित्याविना चढाई केली आहे. कोणत्याही मदतीविना सर्वाधीक इमारती चढून गेल्याबद्दल त्याची नोंद गिनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.

'French Spiderman' foiled in Seoul skyscraper attempt | 55 वर्षांचा फ्रेंच स्पायडरमॅन दक्षिण कोरियातील पोलिसांच्या जाळ्यात

55 वर्षांचा फ्रेंच स्पायडरमॅन दक्षिण कोरियातील पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

सेऊल- फ्रान्समध्ये स्पायडरमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या अलेन रॉबर्टला दक्षिण कोरियामध्ये अटक करण्यात आलेली आहे. कोणत्याही साधनांविना इमारतींवर चढून जाणारा या रॉबर्टने सेऊलमधील 123 मजल्यांची लोटे वर्ल्ड टॉवर ही इमारत चढण्याचा प्रयत्न केला मात्र कोरियातील पोलिसांनी त्याला मध्येच उतरणे भाग पाडले. इमारतीच्या देखभाल करणाऱ्या क्रेनमधून त्याला गच्चीवर नेण्यात आले आणि मग त्याला अटक केली गेली.

55 वर्षांच्या रॉबर्टला फ्रेंच स्पायडरमॅन म्हणून ओळखले जाते. दोरी किंवा कोणत्याही साहित्याशिवाय इमारतींवर चढून जाणे या त्याच्या सवयीमुळे तो प्रसिद्ध आहे. पण कोरियामध्ये मात्र त्याला हे करण्यापासून रोखण्यात आले. त्याला पोलिसांनी अटक केल्यावर वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, मी जवळजवळ 75 मजले चढून गेलो होतो मात्र पोलीस मला रोखू लागले, नंतरनंतर तर तो उंदिर-मांजराचा खेळच झाला म्हणून मी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. मी हे सगळं उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये संवादाचे वारे वाहात आहे त्याच्या आनंदाप्रित्यर्थ केलं. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन यांना धन्यवाद देण्याचा हा माझा मार्ग आहे.



रॉबर्टने आजवर 100 हून अधिक उंच इमारतींवर दोरी व इतर साहित्याविना चढाई केली आहे. कोणत्याही मदतीविना सर्वाधीक इमारती चढून गेल्याबद्दल त्याची नोंद गिनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.

आयफेल टॉवर, सीडनीचे ऑपेरा हाऊस, मलेशियाचे पेट्रोनॉस टॉवर, दुबईतील बुर्ज खलिफा अशा इमारती त्याने कोणत्याही साधनाच्या मदतीशिवाय चढण्याचा विक्रम केला आहे. या उद्योगात रॉबर्ट अनेकवेळा जखमी झाला असून त्याला वारंवार दुखापत झाली असून, त्याला अनेकवेळा अटकही झाली आहे. कोणत्याही परवानगीविना त्याने लोटे वर्ल्ड टॉवर चढण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे या संकुलाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

Web Title: 'French Spiderman' foiled in Seoul skyscraper attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.