चीन व पाकिस्तानची मैत्री अभेदय : कियांग
By admin | Published: September 23, 2016 01:33 AM2016-09-23T01:33:37+5:302016-09-23T01:33:37+5:30
चीन आणि पाकिस्तान यांनी एकमेकांना नेहमीच ठामपणे पाठिंबा दिला असून, उभयतांची मैत्री अभेद्य आहे, असे चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी म्हटल्याचे वृत्त चीनची अधिकृत वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ दिले.
न्यूयॉर्क : चीन आणि पाकिस्तान यांनी एकमेकांना नेहमीच ठामपणे पाठिंबा दिला असून, उभयतांची मैत्री अभेद्य आहे, असे चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी म्हटल्याचे वृत्त चीनची अधिकृत वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ दिले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनिमित्त ली कियांग व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट झाली, त्या वेळी त्यांनी वरील भाष्य केले.
शिन्हुआने दिलेल्या वृत्तात काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाचा चुकूनही उल्लेख नव्हता हे विशेष. चीन व पाकिस्तानची मैत्री ही व्यूहरचनात्मक व नेहमीच अभेद्य राहिलेली आहे. चीन नेहमीच पाकिस्तानला सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे आणि दोन्ही देशांत द्विपक्षीय संबंधांना नवी प्रेरणा मिळण्यासाठी संयुक्त प्रयत्न करायला तयार आहे, असे कियांग म्हणाले.
व्यावहारिक सहकार्यामध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर (सीपीईसी) भर आहे व त्यामुळे सकारात्मक प्रगती झाली आहे. कॉरिडॉरची उभारणी ही दोन्ही देशांनी नियोजनबद्धरीत्या करावी, ग्वॉदर बंदराचे काम वेगाने करावे आणि औद्योगिक पट्ट्यात आणखी कंपन्या आणाव्यात, असे कियांग म्हणाल्याचे वृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)