फ्रान्समध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2016 04:23 AM2016-06-08T04:23:53+5:302016-06-08T04:23:53+5:30

फ्रान्समध्ये आयोजित युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

Frightening atmosphere in France | फ्रान्समध्ये भीतीचे वातावरण

फ्रान्समध्ये भीतीचे वातावरण

Next


पॅरिस : फ्रान्समध्ये आयोजित युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, तरी यजमान देशाला दहशतवादी हल्ल्याची भीती सतावत आहे.
१० जून ते १० जुलै या कालावधीत होणाऱ्या युरो कप स्पर्धेच्या निमित्ताने लाखो पर्यटक आणि जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी राहणार आहे. अशा स्थितीत फ्रान्सवर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याव्यतिरिक्त पर्यटक आणि मीडियाच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे.
फ्रान्सच्या दहशतवादविरोधी शाखेचे एक अधिकारी म्हणाले,‘तयारीचा विचार करता आम्ही आमच्या पातळीवर योग्य खबरदारी घेतली आहे. पोलीस, अर्धसैनिक दल आणि मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आलेले आहेत. पण, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला चिंता भेडसावत आहे. यापूर्वी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी रविवारी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.’
राष्ट्रपतींनी फ्रान्स रेडिओवर म्हटले की,‘सुरक्षेच्या मुद्यावर अखेरच्या क्षणापर्यंत आम्हाला भीती सतावत राहणार आहे, असे दुर्भाग्याने म्हणावे लागते. त्यामुळे युरो कपचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आपल्याला आवश्यक ते पाऊल उचलावे
लागणार आहे. फ्रान्सपुढे सर्वांत
मोठे आव्हान सीरिया आणि इराक येथून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्याचे आहे. हे लोक खोट्या पासपोर्टच्या आधारावर युरोपमध्ये दाखल होतात आणि दहशतवादी कारवाया करतात.’
अधिकारी पुढे म्हणाला,‘बाहेरून येणाऱ्या व्यक्तींपेक्षा यापूर्वी युरोपात दाखल झालेल्या व्यक्तींपासून आम्हाला अधिक धोका आहे. आम्ही काही सीमेवर नव्याने चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे, पण केवळ सीमा बंद करून त्यांना रोखणे शक्य होईल, असे वाटत नाही. युक्रेनच्या सुरक्षा व्यवस्थेने सोमवारी फ्रान्सवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याचा दावा केला. त्यामुळे फ्रान्सला दहशतवादी हल्ल्याची भीती अधिक सतावत आहे.
युक्रेन सुरक्षा व्यवस्था एसबीयूचे प्रमुख व्हेसिली ग्रिटसेक म्हणाले,‘गेल्या महिन्याच्या अखेरीस पोलंडच्या सीमेवर फ्रान्सच्या एका नागरिकला अटक करण्यात आली. त्याच्याकडे रॉकेट लाँचर, क्लाशिनकोव्ह रायफलसह मोठ्या संख्येने हत्यारे मिळाली. चौकशीनंतर कळले की, ही व्यक्ती युक्रेनच्या सशस्त्र समूहांकडून हत्यारे व स्फोटके विकत घेण्याच्या प्रयत्नात होती. त्याच्या निशाण्यावर सरकारी इमारतींव्यतिरिक्त यहुदी व मुस्लिमांची प्रार्थनास्थळे होती. युरो कप स्पर्धेदरम्यान या स्थळांवर हल्ला करण्याची त्याची योजना होती.
यापूर्वी गेल्या आठवड्यात अमेरिकेने फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने स्पष्ट केले की, उन्हाळ्यामध्ये युरोपात अधिक पर्यटक पर्यटनासाठी येत असल्यामुळे दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. फ्रान्सच्या यजमानपदाखाली युरो कप स्पर्धेच्या लढती १० स्थळांवर होणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फ्रान्सने १० स्थळांवर ९० हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या व्यतिरिक्त १० हजार अर्धसैनिक आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १३० व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून युरोपमधील सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. तरी मार्च महिन्यात ब्रसेल्समध्ये आयएसने हल्ला केला होता. त्यात ३२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Frightening atmosphere in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.