युद्धाने भारतात इंधन टंचाई?; भारताकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 08:41 AM2024-01-25T08:41:50+5:302024-01-25T08:41:57+5:30
तेल आयातीवर परिणाम; भारताकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चिंता
वॉशिंग्टन : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संघर्ष आणि हिंद महासागरातील वाढते हल्ले यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे, असे एका उच्च भारतीय मुत्सद्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) सदस्यांना मंगळवारी सांगितले. भारत यामार्गे मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. हल्ल्यांमुळे जहाज वाहतुकीवर परिणाम झाल्याचा परिणाम म्हणून भारतात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी आर. रवींद्र यांनी एका यूएनएससी खुल्या चर्चेदरम्यान म्हटले की, ‘‘आंतरराष्ट्रीय समुदायासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या स्वतःच्या ऊर्जा आणि आर्थिक हितांवर होतो. ही बिकट परिस्थिती कोणत्याही पक्षाच्या फायद्याची नाही आणि हे स्पष्टपणे ओळखले पाहिजे. भारताने युद्धग्रस्तांना मोठी मदत केल्याचे रवींद्र यांनी सांगितले.
चर्चेतूनच मार्ग काढा
इस्त्रायलच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन पॅलेस्टिनी लोक सुरक्षित सीमेतील स्वतंत्र देशात मुक्तपणे जगू शकतील, अशा द्वि-राज्य तोडग्यासाठी भारताच्या दीर्घकालीन समर्थनाचा पुनरुच्चार करून रवींद्र म्हणाले की, ‘‘भारताचा ठाम विश्वास आहे की, हा संघर्ष दोन्ही बाजूंच्या चर्चेतूनच वाटाघाटींद्वारे सुटू शकतो.’’
चीनला तणावामुळे चिंता, म्हणे मार्ग काढू
जगातील सर्वांत मोठा निर्यातदार चीनने म्हटले की, लाल समुद्रातील तणावाबाबत आपण खूप चिंतित आहोत, त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला असून, अनेक जहाजे सुएझ कालव्याकडे जाण्याचे टाळत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी बुधवारी सांगितले की, चीन तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत आहे. इराण समर्थित हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील अनेक जहाजांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. आम्ही लाल समुद्रातील अलीकडील परिस्थितीबद्दल अत्यंत चिंतित आहोत, असे वांग यांनी म्हटले. लाल समुद्र हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग आहे.
तणावामुळे संकटे
रशियाकडून भारताला तेलाची आयात मोठ्या प्रमाणात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत रशियाने भारताला सर्वाधिक तेल पुरवठा केला होता. त्यानंतर इराक आणि सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण आयातीतील रशियन तेलाचा वाटा २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सुमारे दोन-पंचमांश झाला आहे. क्रूडचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी लाल समुद्राचा मार्ग हा पसंतीचा पर्याय आहे. मात्र, समुद्रातील तणावामुळे यात संकटे येत आहेत.
तेलाच्या किमती वाढणार?
परिस्थिती सुधारत नसल्यामुळे आणि धोका वाढल्याने तेलाच्या किमती वाढू शकतात. भारताला सवलतीच्या रशियन तेलाचा फायदा होत होता, परंतु सध्याच्या परिस्थितीत भविष्यातील करार धोक्यात येऊ शकतात.
nअशा स्थितीत भारत कदाचित मध्यपूर्वेतून पर्यायी पुरवठा शोधू शकेल, असे व्यापारतज्ज्ञांनी म्हटले आहे.