इंधन तुटवड्याने गाझात मदतकार्य बंद पडणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा; इस्रायली हल्ले सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:28 AM2023-10-26T05:28:00+5:302023-10-26T05:28:34+5:30

हिजबुल्ला, इस्लामिक जिहाद, हमासमध्ये चर्चा.

fuel shortages will halt aid efforts in gaza united nations warning israeli attacks continue | इंधन तुटवड्याने गाझात मदतकार्य बंद पडणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा; इस्रायली हल्ले सुरुच

इंधन तुटवड्याने गाझात मदतकार्य बंद पडणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा; इस्रायली हल्ले सुरुच

रफाह : इस्रायलने गाझाच्या केलेल्या कोंडीमुळे तिथे इंधनाचा विलक्षण तुटवडा जाणवत असून, त्यामुळे तेथील मदतकार्य लवकरच बंद पडण्याचा धोका आहे, अशी भीती पॅलेस्टाईन नागरिकांच्या मदतीसाठी सक्रिय असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या यूएनआरडब्ल्यूए या संस्थेने व्यक्त केली. दोन आठवड्यांपूर्वी हमासने इस्रायलवर हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर अद्यापही हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. 

गाझा येथे संघर्षात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी तेथील रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे नाहीत. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने किंवा काही ठिकाणी वीजपुरवठा तोडण्यात आल्यामुळे रुग्णालयांत शस्त्रक्रिया करणेदेखील अवघड झाले आहे. गाझातील २३ लाख लोकसंख्येपैकी १४ लाख लोक सुरक्षित ठिकाणी रवाना झाले आहेत. त्यातील ६ लाख  लोकांनी संयुक्त राष्ट्रांनी उभारलेल्या निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. गाझामध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी यांचाही तुटवडा आहे. तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यासाठी इजिप्तने आपली सीमा खुली केली. मात्र, यूएनआरडब्ल्यूएकडे असलेला इंधनाचा साठा लवकरच संपणार आहे. तसे झाल्यास या संस्थेतर्फे गाझात सुरू असलेले मदतकार्यही बंद पडण्याची शक्यता आहे. 

गुटेरेस यांनी केले दहशतवादाचे समर्थन, इस्रायलची टीका हमासने केलेल्या हल्ल्यामागे काही कारणे आहेत, असे विधान करून संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी दहशतवादाचे समर्थन केल्याची टीका इस्रायलने केली आहे.

हिजबुल्ला, इस्लामिक जिहाद, हमासमध्ये चर्चा

लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेचा नेता हसन नसरल्ला याने हमासचा सालेह अल्-अरोरी, इस्लामिक जिहाद संघटनेचा नेता झियाद अल्-नाखलेह या दोघांशी बुधवारी चर्चा केली. गाझातील संघर्षाची व्याप्ती वाढत असल्यामुळे भविष्यात कोणती पावले उचलायची, या विषयावर तिघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. या तीनही संघटनांना इराणकडून मदत मिळत असल्याचा आरोप इस्रायल, अमेरिका व इतर देशांनी केला होता.

इस्रायलला स्वत:चे निर्णय घेण्याचा हक्क : जो बायडेन

इस्रायलला स्वत:चे निर्णय घेण्याचा हक्क असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. इस्रायलला आमचा पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. गाझामधील संघर्षामुळे इस्रायलमध्ये अडकलेल्या अमेरिकी नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी अमेरिका योजना अंमलात आणणार आहे.

काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याची पाकला सवय, भारताची टीका

इस्रायल-गाझामधील स्थितीचा उल्लेख करताना संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्तानने काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला होता. पाकिस्तानला काश्मीरचा प्रश्न सतत उपस्थित करायची सवय लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या म्हणण्याला आम्ही उत्तर देणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी आर. रवींद्र म्हणाले.

 

Web Title: fuel shortages will halt aid efforts in gaza united nations warning israeli attacks continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.