दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 06:54 AM2023-08-04T06:54:47+5:302023-08-04T06:55:17+5:30
इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.
तेहरान : कडक उन्हामुळे इराणमध्ये प्रथमच दाेन दिवसांचा संपूर्ण बंद जाहीर करण्यात आला आहे. इराण सरकारने सर्व कार्यालये, शाळा आणि बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारचे प्रवक्ते अली बहादुरी-जहरोमी म्हणाले की, सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सिस्तान- बलुचिस्तानमध्ये वाढत्या तापमान आणि धुळीच्या वादळामुळे अलीकडेच जवळपास १,००० लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, इराणमधील विजेचा वापर यावर्षी विक्रमी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. लोक उष्णतेमुळे एसीचा वापर वाढवत आहेत. विजेचा वापर वाढल्याने अनेक ठिकाण वीजकपातही करण्यात येत आहे.
इतर देशातही वीज कपात
- गेल्या वर्षी तापमानवाढीपासून वाचण्यासाठी इराकने नागरिकांना सुट्टी जाहीर केली होती.
- तर रशियानेही तापमानवाढ आणि विजेचा वाढता वापर यामुळे दिवसात किमान एकदा तरी वीज कपात होत आहे.
जगभरात काय घडतेय?
अलीकडच्या काही महिन्यांत, भारत, मेक्सिको आणि फिलीपिन्समधील शाळांनी मुलांना घरी पाठवले. अनेक देशात शिकवण्याचे तास बदलले आहेत. ग्रीसमध्ये दुपारी कामावर येण्यास निर्बंध आहेत.
- ६.५ अब्जाहून अधिक लोक किंवा जगभरातील एकून लोकसंख्येच्या ८१ टक्के लोकांना जुलैमधील वाढत्या तापमानाचा फटका बसला आहे.
- २.४ ट्रिलियन डॉलरपर्यंतचे आर्थिक नुकसान उष्णतेमुळे होईल.
...तर अनेकांचे जीव जातील
जोपर्यंत देश जीवाश्म इंधन जाळणे कमी करत नाहीत तसेच पायाभूत सुविधांना बळकटी देत नाहीत तोपर्यंत जगभरात उष्णतेमुळे अनेक जीव जातील शिवाय अनेकांचा रोजगार जाईल.