संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 09:34 AM2024-11-20T09:34:05+5:302024-11-20T09:35:19+5:30
G20 rio summit: अब्जाधीशांवर जागतिक कराची आकारणी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या विस्ताराच्या मुद्द्यावरही परिषदेत चर्चा झाली.
रिओ-दी-जनेरिओ : ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या जी-२० परिषदेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात जागतिक नेत्यांनी उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी एक जागतिक करार करण्यावर भर दिला. तसेच पश्चिम आशियासह युक्रेन युद्धसमाप्तीचे आवाहन केले. या जाहीरनाम्यात अनेक गोष्टींचा उल्लेख असला तरी हे लक्ष्य कसे साध्य केले जाणार, याचा सविस्तर उल्लेख नाही.
या संयुक्त जाहीरनाम्याला सदस्य देशांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले असले तरी सर्वसंमती मिळाली नाही. अब्जाधीशांवर जागतिक कराची आकारणी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या विस्ताराच्या मुद्द्यावरही परिषदेत चर्चा झाली. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्य देशांव्यतिरिक्त इतर माध्यमांतून सुधारणांवर भर देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या तीनदिवसीय परिषदेची बुधवारी सांगता झाली.
या मुद्द्यांचे होते परिषदेत महत्त्व
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी कार्यकाळातील धोरणांबाबतची अनिश्चितता.
इस्रायल-हमास युद्धासह इराणशी असलेला तणाव या मुद्द्यांवर जी-२०च्या सदस्यांत एकमत घडवून आणणे.
इस्रायल, रशिया, युक्रेन भागांतील युद्धांवर कोणाचीही बाजू न घेता संयुक्तरीत्या शांततेचे आवाहन करणे.
बायडेन, पुतिन यांची भूमिका महत्त्वाची
या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे व्लादिमिर पुतिन यांची भूमिका अधिक महत्त्वाची होती. यात जाहीरनाम्यापूर्वीच बायडेन यांनी पश्चिम आशियात हमास संघटनेला दोषी मानले होते. शिवाय युक्रेनचे जोरदार समर्थन केले होते. तर, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने वॉरंट काढल्यामुळे पुतीन या परिषदेत सहभागी झाले नव्हते; त्यांच्या वतीने परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदींची प्रमुख देशांच्या नेत्यांशी चर्चा, आर्थिक संबंधांसह गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर भर
नरेंद्र मोदी यांनी सहभागी देशांच्या प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय मुद्द्यांसह परस्परसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. यात इटली, इंडोनेशिया, नॉर्वे, पोर्तुगाल, इजिप्त, दक्षिण कोरियासह इतर देशांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपमहासंचालक गीता गोपीनाथ आणि युरोपीय संघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेएन यांचीही माेदी यांनी भेट घेतली. एक दिवस आधी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी मोदींनी चर्चा केली होती. मात्र, याचा तपशील कळू शकला नाही.
व्यापार-तंत्रज्ञानावर इटलीशी चर्चा
मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी सुरक्षा, व्यापार आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर चर्चा केली.
फ्रान्सशी अवकाश, एआय सहकार्य
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रा यांच्याशी अवकाश, ऊर्जा आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रांत सहकार्याविषयी चर्चा केली.
पोर्तुगालशी आर्थिक संबंध वाढवणार
पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉटेनेग्रो यांच्याशी मोदींनी आर्थिक संबंधांवर चर्चा केली. अक्षय्य ऊर्जा आणि हरित हायड्रोजन हे मुद्देही चर्चेत होते.