गलवान हिंसा: चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचाराल तर तुरुंगात जाल!; चीनचा नवा कायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:20 PM2021-03-24T17:20:02+5:302021-03-24T17:22:13+5:30
गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बराच काळ चीननं आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबतची माहिती दडवून ठेवली होती.
गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बराच काळ चीननं आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबतची माहिती दडवून ठेवली होती. जूनमध्ये झालेल्या या घटनेनंतर तब्बल ८ महिन्यांनी चीननं नुकतंच या हिंसाचारात चीनचे सैनिक मारले गेल्याचं अधिकृतरित्या मान्य केलं. पण आता यात मारले गेलेल्या चीनी सैनिकांबाबत प्रश्न विचारणं हा गुन्हा ठरवणारा एक कायदा चीनमध्ये लागू करण्यात आला आहे.
१ मार्चपासून चीनमध्ये एक नवा कायदा लागू करण्यात आला आहे. यात सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुठंही सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना कमीत कमी तीन वर्षांची शिक्षेची तरतूद केली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार गलवान खोऱ्यातील संघर्षात चार सैनिक मारले गेले आहेत. पण भारतानं चीनचे अनेक सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. भारतीय लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार चीनचे २० हून अधिक सैनिक झटापटीत मारले गेले होते.
एका ब्लॉगरला तुरुंगवासाची शिक्षा
गेल्याच महिन्यात लिटिल स्पायसी पेन बॉल नावाचा ब्लॉग लिहिणाऱ्या किऊ जिमिंग याला चीनकडून अटक करण्यात आली होती. त्यानं आपल्या ब्लॉगमध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. "चीनी सैनिकांचा मृत्यू आपल्या साथीदार सैनिकांचे प्राण वाचवताना झाला असं जर असेल तर असे आणखी काही सैनिक असतील की ज्यांना वाचविण्यात यश आलं नाही. म्हणजेच यात अनेक सैनिक दगावले असू शकतात", असं या ब्लॉगरनं लिहिलं होतं. सोशल मीडियात या ब्लॉगरचे तब्बल २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गलवान हिंसेवर प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी या ब्लॉगरला आता तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ६ जणांना शिक्षा
चीनी सैनिक शहीद झाल्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किंवा सरकारला सवाल विचारण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ६ जणांना अक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षासाठी बलिदान देणाऱ्यांनाही 'क्रांतिकारी' आणि 'शहीदा'चा दर्जा दिला जातो आणि याबाबत सवाल उपस्थित करणाऱ्यांना अटक केली जाते.