लॉस एंजेलिसमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:26 PM2018-10-02T12:26:20+5:302018-10-02T12:52:04+5:30

पुढील पिढीला मराठी संस्कृती समजावी म्हणून लॉस एंजेलिसच्या मराठी मंडळातर्फे मराठी शाळा चालवल्या जातात.

ganesh festival celebration in Los Angeles | लॉस एंजेलिसमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत

लॉस एंजेलिसमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत

Next

लॉस एंजेलिसच्या महाराष्ट्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे 22 सप्टेंबरला गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला.  लॉस एंजेलिस आणि जवळपासच्या परिसरातील सुमारे 700 जणांनी गणपतीचे उत्साहात स्वागत केले. या वर्षी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कमळातील गणपती व अष्टविनायक अशी सुरेख सजावट केली होती. गणपतीला अनेक भक्तांनी प्रसाद व फुले अर्पण केली. मंडळाच्या प्रथेप्रमाणे एक नवीन दांपत्याला साग्रसंगीत गणपतीपूजेसाठी बोलावले होते. 

पुढील पिढीला मराठी संस्कृती समजावी म्हणून लॉस एंजेलिसच्या मराठी मंडळातर्फे मराठी शाळा चालवल्या जातात. सध्या सुमारे १०० विद्यार्थीं ४ शाळांमधून मराठी शिकत आहेत.  त्या शाळेतील विद्यार्थाना भारती विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन कौतुक करण्यात आले. 

अरवाईन कॅलिफोर्निया येथील मराठी शाळेतील विद्यार्थांनी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा कसा केला याबद्दल भाषण व मिरवणुकीची एक झलक सादर केली.  त्यानंतर पुणे येथील स्वाती दैठणकर यांनी भरतनाट्यम व धनंजय दैठणकर यांनी सुरेल संतूर वादन करून श्रोत्यांची मने जिंकली. हा एक संस्मरणीय व नितांत सुंदर अनुभव होता. या वर्षी मंडळातर्फे एक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच गणेशोत्सवासंबंधी चित्र अथवा शिल्पकला सादर करण्यात आल्या व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. 

गणेशाची उत्तरपूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढून व बाप्पांना पुढीलवर्षी लवकर या अशी आळवणी करत विसर्जन करण्यात आले. अमेरिकेतील धकाधकीच्या जीवनात एक दिवस का होईना एकत्र येऊन आपली संस्कृती जपण्याचा, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक छोटा प्रयत्न मंडळाचे कार्यकर्ते, स्नेही व सभासद यांच्या सहकार्याने सफल झाल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. 


 

Web Title: ganesh festival celebration in Los Angeles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.