पाकमध्ये लष्कर-सरकारमध्ये दरी

By admin | Published: October 29, 2016 02:42 AM2016-10-29T02:42:49+5:302016-10-29T02:42:49+5:30

पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वात दरी निर्माण झाल्याची चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या तीन वरिष्ठ सहकाऱ्यांनी लष्कर प्रमुख जनरल

The gap between the army and the government in Pakistan | पाकमध्ये लष्कर-सरकारमध्ये दरी

पाकमध्ये लष्कर-सरकारमध्ये दरी

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वात दरी निर्माण झाल्याची चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या तीन वरिष्ठ सहकाऱ्यांनी लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांची भेट घेऊन विद्यमान परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा केली. शरीफ यांचे कनिष्ठ बंधू
आणि पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ, गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि अर्थमंत्री इशाक दार हे काल सायंकाळी लष्कर प्रमुखांना भेटले.
लष्कराच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडी येथील आर्मी हाऊसमध्ये ही बैठक घेण्यात आली आणि ती ९० मिनिटे चालली. पाकची गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिजवान अख्तर यावेळी उपस्थित होते. डॉन वृत्तपत्रात या महिन्याच्या प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत लष्कराने नाराजी व्यक्त केली होती. देशातील दहशतवादी संघटनांना आयएसआयचा छुपा पाठिंबा असल्यावरून मुलकी आणि लष्करी नेतृत्वात दुही निर्माण झाल्याचे वृत्त डॉनने दिले होते.
पश्चिम आणि पूर्व या दोन्ही सीमांवर आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय स्थैर्य अबाधित राहावे असेच लष्कराला वाटते. तेहरिक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना शांत करण्यासाठी शरीफ यांच्या सहकाऱ्यांनी लष्कराकडे काही मदत मागितली किंवा काय हे लगेचच समजू शकले नाही. (वृत्तसंस्था)

शरीफ यांनी राजीनामा द्यावा : इम्रान खान
भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी इम्रान यांची मागणी आहे. शरीफ यांच्यावर दबाव आणण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी देशाची राजधानी ठप्प करण्याचा इशारा इम्रान यांनी दिला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानेही ते आंदोलन करीत आहेत. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी संचारबंदी वा जमावबंदी लागू करण्याचा शरीफ सरकारचा प्रयत्न आहे. पाकच्या लष्कराने आतापर्यंत किमान चार वेळा लोकनियुक्त सरकारे उलथवून सत्तासूत्रे ताब्यात घेतली आहेत. देशात जेव्हाजेव्हा राजकीय अस्थैर्य निर्माण होते तेव्हा तेव्हा लष्कर चर्चेत येते.

Web Title: The gap between the army and the government in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.