ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्समध्ये गरुडसेना!

By admin | Published: February 21, 2017 01:12 AM2017-02-21T01:12:13+5:302017-02-21T01:12:13+5:30

ड्रोन या मानवरहीत हवाईअस्त्रापासून असलेल्या संभाव्य धोक्याचा मुकाबला करण्यासाठी फ्रान्सचे

Garudassa in France to destroy the drones! | ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्समध्ये गरुडसेना!

ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्समध्ये गरुडसेना!

Next

पॅरिस : ड्रोन या मानवरहीत हवाईअस्त्रापासून असलेल्या संभाव्य धोक्याचा मुकाबला करण्यासाठी फ्रान्सचे लष्कर आता गरुडसेनेला प्रशिक्षण देत आहे!
वायव्य फ्रान्समध्ये बॉर्ड्यूपासून १३० किमी अंतरावर असलेल्या मॉन्ट-डी- मर्सान या हवाईतळावर गेल्या जूनपासून ‘गोल्डन ईगल’ जातीच्या चार गरुडांना ड्रोन दिसताच त्यांच्यावर हल्ला करून ते हवेतच नष्ट करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या गरुडांच्या कामगिरीचा मध्यावधी आढावा घेण्यात आला व ते शत्रूला नेस्तनाबूत करण्याचे कौशल्य समाधानकारकपणे आत्मसात करीत आहेत, असे प्रशिक्षक कमांडर ख्रिस्तोफ यांनी सांगितले.
या गरुडांना एकूण दोन वर्षांचे प्रशिक्षण देण्यात येईल. पूर्ण प्रशिक्षित झाल्यावर त्यांनी ड्रोन हवेत दिसताच त्याच्या रोखाने झेप घेऊन त्यांचा हवेतच फडशा पाडावा अशी अपेक्षा आहे. सुरुवातीस या गरुडांना जमिनीवरून झेप घेत समांतर उडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. नंतर त्यांना ५०० मीटर उंजीवर असलेल्या टाकीवरून लक्ष्यावर कशी झडप घालावी हे शिकविण्यात आले. सर्वात शेवटी त्यांना नजिकच्या पर्वतराजींत नेऊन डोंगराच्या उंच कड्यांवरून खाली दरीमध्ये झेप घेण्याचे प्रशिक्षम दिले जाईल.
गेली काही वर्षे फ्रान्स अतिरेकी हल्ल्यांचे लक्ष्य राहिले आहे व अतिरेक्यांनी प्रगत तंत्राचा अवलंब केल्याने असे हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याचा वास्तववादी धोका सर्वच सुरक्षा यंत्रणांना भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे. विमानतळ, मोठ्या क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय सभा-सम्मेलने अशा संभाव्य धोक्यांच्या ठिकाणी असे तरबेज गरूड संशयास्पद ड्रोनना अचूक टिपण्यासाठी तैनात केले जाऊ शकतील. सुरक्षेसाठी मानवी जवान व विमानांचा वापर करण्याच्या तुलनेत ही गरुडसेना खूपच कमी खर्चिक आहे, याकडेही कमांडक ख्रिस्तोफ यांनी लक्ष वेधले.
या पहिल्या तुकडीतील गरुडांना फ्रेच कादंबरीकार अ‍ॅलेक्झांद्रे द््युमास यांच्या ‘थ्री मस्केटीयर्स’ या कादंबरीतील डी‘अर्तागनान, अ‍ॅथॉस, प्रोथॉस आणि अरामिस या लोकप्रिय योद्ध्यांच्या पात्रांची नावे देण्यात आली आहेत. ही पहिली तुकडी प्रशिक्षित झाल्यावर आणखी चार ‘गोल्डन ईगल’ गरुडांना प्रशिक्षित करण्याचाही फ्रान्सचा विचार आहे. ड्रोन्सचा मुकाबला करण्यासाठी गरुडासारख्या शिकारी पक्ष्यांचा वापर करण्याचा विचार करणारा फ्रान्स हा पहिला देश नाही.
याआधी नेदरलँड््सने सन २०१५ मध्ये ‘बाल्ड ईगल्स’ या जातीच्या गरुडांचा या कामासाठी वापर करून पाहिला होता. (वृत्तसंस्था)

जिगरबाज ‘गोल्डन ईगल’
च्गोल्डन ईगल हा हुकासारखी वाकडी चोच असलेला नैसर्गिकरीत्या कमालीचा आक्रमक असा शिकारी पक्षी आहे.
च्यांच्या पंखांचा पसारा सात फुटांपर्यंत व वजन ३ ते५
किलो म्हणजे सर्वसाधारण ड्रोनएवढेच असते.
च्यांची नजर अत्यंत तीक्ष्ण असते व ते दोन किमी अंतरावरूनही आपले
लक्ष्य अचूकपणे हेरू शकतात.
च्हे गरुड लक्ष्य टिपण्यासाठी झेपावतात तेव्हा त्यांचा वेग ताशी ८० किमीपर्यंत जाऊ शकतो.

Web Title: Garudassa in France to destroy the drones!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.