गेट्स फाउंडेशनची मोठी घोषणा, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देणार 10 कोटी डॉलर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 05:20 PM2020-03-19T17:20:50+5:302020-03-19T17:28:23+5:30
यावेळी बिल गेट्स यांनी यांनी जनतेला शांताता राखण्याचे आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले.
वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनने 10 कोटी डॉलर देण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर या शिवाय वाशिंगटनच्या मदतीसाठीही 50 लाख डॉलर देणार असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
यावेळी बिल गेट्स यांनी यांनी जनतेला शांताता राखण्याचे आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले.
गेट्स यांनी बुधवारी रेडिट या सोशल मीडिया साईटवर युजर्सच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले आहे, की तपासणीसाठी शहर आणि संस्था बंद करण्यात काहीही अडचण नाही. यामुळे लोक घरातून बाहेर पडणार नाहीत आणि कोरोनाला अटकाव घालता येईल.
संपूर्ण जगालाच आर्थिक नुकसानाची चिंता आहे. मात्र विकसनशील देश यामुळे अधिक प्रभावित होतील. कारण, असे देश श्रींमत देशांप्रमाणे सामाजिक दृष्ट्या दूर राहू शकत नाहीत. एवढेच नाही, तर विकसनशील देशांत रुग्णालयांची संख्या आणि त्यांची क्षमतादेखील कमीच आहे. गेट्स फाउंडेशन डायग्नोस्टिक्स, वैद्यकीय विज्ञान आणि लस तयार करणाऱ्या लॅबसोबत काम करत आहे, असेही गेट्स यांनी सांगितले.
बिल गेट्स यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. यामागचे कारण कंपनीने गेट्स यांना सामाजिक कार्यांसाठी वेळ मिळावा, असे दिले आहे. मात्र, असे असले तरीही गेट्स हे कंपनीचे सीईओ सत्या नडेला आणि अन्य अधिकाऱ्यांचे सल्लागार राहणार आहेत.
जगभरातील मृतांचा आकडा 8,900 वर -
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरुवारी (19 मार्च) 2,20,827 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृतांची संख्या 8,900 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 85,121 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे.