गौरी लंकेश यांचे नाव अमेरिकेतील ‘न्युझियम’च्या स्मारकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:45 AM2018-06-06T00:45:02+5:302018-06-06T00:45:02+5:30
पत्रिकारिता आणि बातम्यांचा इतिहास सांगणारे जगातील सर्वांत मोठे संग्रहालय असलेल्या ‘न्युझियम’मधील पत्रकारांच्या स्मारकामध्ये गौरी लंकेश व सुदीप दत्ता भौमिक या दोन भारतीयांसह अठरा पत्रकारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
वॉशिंग्टन : पत्रिकारिता आणि बातम्यांचा इतिहास सांगणारे जगातील सर्वांत मोठे संग्रहालय असलेल्या ‘न्युझियम’मधील पत्रकारांच्या स्मारकामध्ये गौरी लंकेश व सुदीप दत्ता भौमिक या दोन भारतीयांसह अठरा पत्रकारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे त्याची तीव्रतेने जाणीव सर्वांना व्हावी या हेतूने अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे ‘न्युझियम’ संग्रहालयात पत्रकारांचे हे स्मारक उभारले आहे. त्यात यंदा आठ महिलांसह अठरा पत्रकारांची नावे समाविष्ट केली आहेत.
गौरी लंकेश यांच्याविषयी न्युझियमने म्हटले की, भारतातील जातीव्यवस्था व हिंदु मुलतत्त्ववादावर घणाघाती प्रहार करणारे लेख गौरी लंकेश नेहमी लिहीत. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हल्लेखोराने गोळ््या झाडून हत्या केली व तो पळून गेला. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदुत्ववादी राजकारणावर सातत्याने कडाडून टीका करीत असत. लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी एका व्यक्तीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सुदीप दत्ता भौमिक या पत्रकाराच्या कामगिरीचा गौरव करताना ‘न्युझियम’ने म्हटले आहे की, निमलष्करी दलातील भ्रष्टाचार सुदीप यांनी त्रिपुरातील एका वृत्तपत्रात लेखन करुन उजेडात आणला होता. त्यानंतर एक आठवड्याने निमलष्करी दलाचा एक अधिकारी तपन देववर्मा याने सुदीप यांना २१ नोव्हेंबर २०१७ रोजी भेटायला बोलावले. त्यावेळी रागाच्या भरात देववर्माने आपल्या अंगरक्षकाला सुदीप यांना गोळी घालून ठार मारण्याचा आदेश दिला. दक्षिण अशियाई देशांतील यामिन रशीद या पत्रकाराच्या नावाचाही यंदा न्यूजियमच्या स्मारकात समावेश करण्यात आला आहे. मालदीवमधील द डेली पॅनिक या वृत्तपत्रासाठी यामिन काम करत होते. (वृत्तसंस्था)
२३२३ पत्रकारांच्या बलिदानाची घेतली दखल
कर्तव्य बजावताना मरण पत्करावे लागलेल्या जगभरातील २३२३ पत्रकारांची त्यांच्या छायाचित्रांसह माहिती न्युझियममधील पत्रकारांच्या स्मारकात देण्यात आली आहे. त्यात संपादक, बातमीदार, छायाचित्रकार आदींचा समावेश आहे. त्यामध्ये ८० भारतीय पत्रकारांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
आता पत्रकारितेचे स्वातंत्र्य व सत्यनिष्ठा जपण्यासाठी २०१७ साली आपल्या प्राणांचे मोल चुकविणाऱ्या गौरी लंकेश व भौमिक या दोन भारतीयांचा त्यात समावेश करण्यात आला.