भीषण! गाझामध्ये वाईट स्थिती! जखमींवरील उपचारात अडचण; डॉक्टर जमिनीवर करताहेत सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 07:20 PM2023-10-18T19:20:24+5:302023-10-18T19:21:42+5:30
Israel Palestine Conflict : 350 मृतांना रुग्णवाहिका आणि खासगी कारद्वारे अल-शिफा, गाझा शहराच्या मुख्य रुग्णालयात नेण्यात आले, जे इतर हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या लोकांमुळे आधीच भरून गेले होते
गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावरील हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करण्यात डॉक्टरांना अनेक अडचणी येत आहेत. वैद्यकीय साहित्याच्या कमतरतेमुळे त्यांना हॉस्पिटलच्या जमिनीवरच एनेस्थिसीया न देता जखमींवर सर्जरी करावी लागत आहे. इस्रायली बॉम्बफेक आणि परिसराची नाकेबंदी दरम्यान झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाजवळ आश्रय घेतलेल्या अनेकांचा मृत्यू झाला आहे.
हमासने रुग्णालयावरील हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे, तर इस्रायली लष्कराने म्हटलं आहे की, पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी डागलेल्या रॉकेटचे निशाणा चुकला, त्यामुळे ही घटना घडली. हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात किमान 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ऑपरेशन रूमचं छत कोसळलं
अल-अलही हॉस्पिटलमध्ये काम करणारे प्लास्टिक सर्जन गासन अबू सित्ता यांनी सांगितलं की, त्यांनी मोठा स्फोटाचा आवाज ऐकला आणि त्यांच्या ऑपरेशन रूमचं छत कोसळलं. "जखमी आमच्याकडे धडपडत येऊ लागले," गासन म्हणाले की, त्यांनी शेकडो मृत आणि गंभीर जखमी लोकांना पाहिलं. एका माणसाला मलमपट्टी केली ज्याचा पाय कापला गेला होता.
रुग्णालयाच्या परिसरात पडलेले मृतदेहांचे तुकडे
'असोसिएटेड प्रेस' ने एका व्हिडिओची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये रुग्णालयाच्या परिसरात मृतदेहांचे तुकडे विखुरलेले दिसतात. मृतांमध्ये अनेक लहान मुलं असून इमारतीला आग लागली होती. हॉस्पिटलच्या बाहेर ब्लँकेट, स्कूल बॅग आणि इतर वस्तू विखुरल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं आहे. स्फोटाच्या ठिकाणी जळलेल्या गाड्या विखुरल्या होत्या आणि जमिनीवर मातीचा ढीग होता.
350 मृतांना रुग्णवाहिका आणि खासगी कारद्वारे अल-शिफा, गाझा शहराच्या मुख्य रुग्णालयात नेण्यात आले, जे इतर हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या लोकांमुळे आधीच भरून गेले होते. रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी ही माहिती दिली. गाझा आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल-किद्रा यांनी सांगितलं की, काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे.
डॉक्टरांनी जमिनीवर केली सर्जरी
डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या जमिनीवर आणि हॉलमध्ये सर्जरी केल्या आहेत. बहुतेक सर्जरी एनेस्थिसीया न देता करण्यात आल्या. आम्हाला उपकरणं, औषध, बेड, एनेस्थिसीया आणि इतर गोष्टींची गरज आहे असं अबू सेल्मिया म्हणाले. रुग्णालयातील जनरेटरचे इंधन काही तासांत संपेल, त्यानंतर रुग्णालयातील काम ठप्प होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.